

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंधांमुळे अन्य अनेक देशांचा जळफळाट होतो, असे स्पष्ट करतानाच ज्यांना डोनाल्ड ट्रम्प भेटू इच्छितात, अशा नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान सर्वात वर असल्याचे विधान भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी केले आहे.
गोर म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पंतप्रधान मोदींना आपले खास मित्र मानतात आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेदरम्यान ज्या नेत्यांना ते भेटू इच्छितात, त्यात मोदींचे नाव सर्वात वर असेल. मोदी फ्लोरिडाला पोहोचल्यावर दोन्ही नेत्यांची स्वतंत्र भेटही होऊ शकते. गोर यांनी ट्रम्प यांच्या पुढील वर्षी भारत दौऱ्याच्या शक्यतेचेही संकेत दिले.
इतक्या मोठ्या व्यापार कराराला वेळ लागणे स्वाभाविक आहे. अमेरिका आणि युरोपीय संघ यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटीचे उदाहरण देत ते म्हणाले, मोठ्या व्यापारी करारांना अनेक वर्षे लागू शकतात. गोर यांच्या मते, भारत आणि अमेरिकेदरम्यान सध्या सुमारे २४० अब्ज डॉलरचा व्यापार आहे. आगामी वर्षांत तो वाढवून ५०० अब्ज डॉलर करणे हे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित व्यापार कराराबाबत गोर म्हणाले की, दोन्ही देश कराराच्या खूप जवळ आले आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर कराराशी संबंधित मुद्द्यांवर पुन्हा काम केले जात आहे. पुढील काही महिन्यांत दोन्ही देश कराराला अंतिम स्वरूप देऊ शकतील अशी आशा आहे.