

India slams Pakistan at UN : १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. जगाला इस्लामाबादच्या ‘४,००,००० महिलांवर सामूहिक बलात्काराच्या परवानगी मोहिमेची’ आठवण करून दिली. भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी जम्मू आणि काश्मीरवरील पाकिस्तानचे आरोप दिशाभूल करणारे आणि आंतरराष्ट्रीय लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत फेटाळून लावले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना पार्वतानेनी हरीश म्हणाले की, "महिला, शांतता आणि सुरक्षेवरील आमचे वर्तन निर्दोष आणि निष्कलंक आहे. जो देश स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करत पद्धतशीर नरसंहार करतो तोच लक्ष विचलित करण्यासाठी केवळ अतिशयोक्ती आणि प्रचाराचा अवलंब करू शकतो." मागील महिन्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मुलांसह ३० जणांच्या मृत्यू झाला होता. दरम्यान, हरीश यांनी १९७१ मध्ये झालेल्या ऑपरेशन सर्चलाइटचाही उल्लेख केला. या कारवाईदरम्यान, पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) मध्ये बंगालींवर हिंसक कारवाई केल्याचे कटू आठवणींचे स्मरण करुन दिले.
पार्वतानेनी हरीश यावलेळी स्वतःच्या मानवाधिकार गंभीर उल्लंघनाची आठवण करून दिली. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान केलेल्या अत्याचारांचा उल्लेख करताना ते म्हणाले, " पाकिस्तानने १९७१ मध्ये 'ऑपरेशन सर्चलाईट' राबवले. आपल्याच सैन्याकरवी ४ लाख महिला नागरिकांवर वंशसंहारक सामूहिक बलात्काराची पद्धतशीर मोहीम चालवली. जगाला पाकिस्तानचा हा प्रचार स्पष्टपणे दिसत आहे." संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, नवी दिल्लीने संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देत, जम्मू आणि काश्मीरबाबत दिशाभूल करणाऱ्या प्रचाराबद्दल फटकारले होते.
याआधी, संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या स्थायी मिशनमधील समुपदेशक सायमा सलीम यांनी काश्मिरी महिलांवर दशकांपासून लैंगिक हिंसाचार होत असल्याचा आरोप केला होता. तसेच युएनएसीमध्ये काश्मिरी महिलांवर होणार्या अत्याचाराचा समावेश करण्याची मागणी केली होती.