India LPG Africa deal | इराण-इस्रायल तणावात भारताचा मास्टरस्ट्रोक

एलपीजी पुरवठ्यासाठी आफ्रिकन देशांशी विशेष करार
India LPG Africa deal |
India LPG Africa deal | इराण-इस्रायल तणावात भारताचा मास्टरस्ट्रोक
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : इराण विरुद्ध इस्रायल - अमेरिका युद्धामुळे जागतिक उर्जा संकट निर्माण झाले आहे. मात्र, भारताने अत्यंत चाणाक्ष कूटनीतीचा वापर करत ऊर्जा सुरक्षा कवच भक्कम केले आहे. भारताने केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता आपला मोर्चा आता आफ्रिकन देशांकडे वळवला आहे. एलपीजी पुरवठ्यासाठी भारताने नायजेरिया, अल्जीरिया, घाना, कांगो आणि अंगोला या देशांशी विशेष करार केले आहेत, तर एलएनजीसाठी कॅमेरून आणि मोझांबिकसारखे देश मदतीला धावून आले आहेत. रशियाची खंबीर साथ आणि आफ्रिकेतील देशांशी केलेली नवी मैत्री भारतासाठी या संकटकाळात गेम चेंजर ठरत आहे.

विशेष म्हणजे, रशियाकडून होणारी तेल आयात भारताने फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात तब्बल 90 टक्क्यांनी वाढवली आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीसाठी दिलेल्या 30 दिवसांच्या विशेष सवलतीचा भारताने योग्य फायदा उठवत आपली अर्थव्यवस्था सुरक्षित केली आहे. समुद्री मार्गावर संकट असले तरी सौदी अरेबिया आणि युएई यांनी पाईपलाईनद्वारे भारताला तेल पुरवठा सुरू ठेवला आहे. सौदीची ईस्ट-वेस्ट यानबू आणि युएईची हबशान-फुजैराह या पाईपलाईन्समुळे होर्मुजची कोंडी टाळून भारताला कच्चे तेल मिळत आहे.

भारताने पुरवठ्याचे स्रोत बदलल्यामुळे आता कच्च्या तेलाची आणि गॅसची उपलब्धता पूर्वीपेक्षा सुधारली आहे. यामुळे आखाती युद्धाचा भारताच्या स्वयंपाकघरातील गॅसवर किंवा इंधन दरांवर मोठा परिणाम होणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले आहे.

तेलवाहू जहाज चीनकडे रवाना झाल्याचे वृत्त चुकीचे

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या बिलावरून इराणी जहाज चीनकडे गेल्याचे वृत्त पेट्रोलियम मंत्रालयाने फेटाळून लावले. तसेच देशाचा येत्या काही महिन्यांचा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने शनिवारी दिली.

भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी कच्च्या तेलाचा साठा सुरक्षित केला आहे. अगदी इराणकडून देखील तेल घेण्यात आले असून बिलासंबंधी कोणतेही अडथळे नाहीत. याबाबत समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांवर आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले. बिलावरून अडचणी निर्माण झाल्याने गुजरातमधील वाडिनार बंदरावर कच्चे तेल घेऊन आलेले इराणी जहाज चीनकडे रवाना झाल्याचे वृत्त शुक्रवारी पसरले होते. हे वृत्त चुकीचे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. भारत 40 हून अधिक देशांकडून कच्चे तेल खरेदी करीत आहे. तेल खरेदीत लवचिकता ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news