Dawood Ibrahim | दाऊद सध्या तिथे लपला, जिथे लादेन मारला गेला

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकिस्तानचा बुरखा फाडला
Dawood Ibrahim |
Dawood Ibrahim | दाऊद सध्या तिथे लपला, जिथे लादेन मारला गेला
Published on: 
Updated on: 

हेग; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर भारताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचे संबंध पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उघडे पाडले आहेत. दाऊद इब्राहिम भारतात नाही, तर तो त्याच देशात वास्तव्यास आहे, जिथे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन सापडला आणि मारला गेला होता, अशा शब्दांत भारताने नाव न घेता थेट पाकिस्तानवर निशाणा साधला. संयुक्त राष्ट्र विशेष प्रतिनिधीच्या अहवालात दाऊदच्या ‘डी कंपनी’चा उल्लेख भारतात तळ असलेली टोळी असा करण्यात आल्यानंतर भारताने हे रोखठोक प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्र आमसभेच्या तिसऱ्या समितीत बोलताना भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव रघू पुरी यांनी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा स्पष्ट केला. अमेरिकेच्या 'नेव्ही सील्स'ने २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथील लष्करी तळाजवळ मोहीम राबवून ओसामा बिन लादेनला ठार केले होते. या ऐतिहासिक कारवाईचा दाखला देत पुरी म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ निर्बंध समितीच्या नोंदीनुसार दाऊद इब्राहिमचे वास्तव्यही त्याच देशात (पाकिस्तानात) असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. पाकिस्तान जागतिक दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान पुरवत असल्याचा हा भक्कम पुरावा आहे.

१९९३ पासून पाकिस्तानातून भारतावर कारवाया

विशेष प्रतिनिधी बेन सॉल यांच्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवताना भारताने स्पष्ट केले की, १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊद भारतातून पळून गेला आणि त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला.

२००३ मध्ये सुरक्षा परिषदेने जेव्हा त्याच्यावर अल कायदाशी संबंधित असल्यामुळे निर्बंध लादले, तेव्हा तो भारताच्या बाहेरूनच आपल्या कारवाया चालवत होता. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पाकिस्तानच्या सुरक्षित छत्राखाली बसून कारवाया करत असताना संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात त्याला 'भारत आधारित' म्हणणे हा वस्तुस्थितीचा मोठा विपर्यास असून अशी विधाने पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला खतपाणी घालतात, अशी तंबी भारताने दिली.

पाकिस्तानच्या आश्रयावर थेट बोट : लादेन ज्या देशात (पाकिस्तान) लपला होता आणि मारला गेला, दाऊदचे वास्तव्यही त्याच देशात असल्याचा भारताचा संयुक्त राष्ट्रांत स्पष्ट पुनरुच्चार.

संयुक्त राष्ट्रांचे पुरावे समोर : संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ निर्बंध समितीच्या अधिकृत नोंदीनुसारच दाऊद पाकिस्तानात राहात असल्याचे भारताने दाखवून दिले.

१९९३ च्या बॉम्बस्फोटांनंतर पलायन : दाऊद १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर भारतातून पळून गेला असून २००३ च्या निर्बंधांवेळी तो भारताबाहेरूनच कारवाया चालवत होता.

अहवालातील निष्काळजीपणा उघड : पाकिस्तानच्या भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करून ‘डी कंपनी’ला भारतात तळ असलेली म्हणणे हा विशेष प्रतिनिधींचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news