India Nuclear Weapons | भारताकडे तब्बल १९० अण्वस्त्रे

‘न्यूक्लियर ट्रायड’ने वाढवले देशाचे सामर्थ्य
India Nuclear Weapons |
India Nuclear Weapons | भारताकडे तब्बल १९० अण्वस्त्रे
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : परदेशी संरक्षण तज्ज्ञांच्या एका ताज्या अभ्यासानुसार भारताकडे सध्या अंदाजे १९० अणुबॉम्बचा साठा आहे. शत्रूच्या हद्दीत अचूक आणि खोलवर मारा करण्याची पूर्ण क्षमता या शस्त्रास्त्रांमध्ये असून भारताकडे केवळ शक्तिशाली अणु आणि हायड्रोजन बॉम्बच नव्हे, तर दूरवर मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रेही सज्ज आहेत.

'बुलेटिन ऑफ द ॲटोमिक सायंटिस्ट्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या मूल्यांकन अहवालानुसार, भारत आपल्या अण्वस्त्रांची मारक क्षमता आणि ती वाहून नेणाऱ्या यंत्रणांचे वेगाने आधुनिकीकरण करत आहे. विशेष म्हणजे, एवढी प्रचंड ताकद असूनही नवी दिल्ली आपल्या 'नो फर्स्ट यूज' (आधी वापर नाही) या मूळ धोरणावर ठाम आहे. अहवालानुसार, भारताने आतापर्यंत सुमारे १९० अण्वस्त्रे तयार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारताने आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत भक्कम अशी तिहेरी यंत्रणा उभी केली असून, जमीन, समुद्र आणि आकाशातून शत्रूवर अचूक प्रतिहल्ला करण्याची क्षमता मिळवली आहे.

अहवालात विशेष नमूद करण्यात आले आहे की, भारत आपल्या सामरिक शस्त्रांची खरी मारक क्षमता, त्यांची तैनाती आणि क्षेपणास्त्रांचा खरा पल्ला याविषयी कमालीची गोपनीयता बाळगतो. त्यामुळे सार्वजनिक पातळीवर चर्चिला जाणारा क्षेपणास्त्रांचा पल्ला केवळ अंदाज असून, भारताची खरी ताकद त्याहून अधिक असू शकते.

राफेल विमानांची वाढती जबाबदारी

काळाच्या ओघात जुनी जग्वार विमाने सेवेतून निवृत्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे फ्रान्सकडून आयात करण्यात आलेली आधुनिक 'राफेल' विमाने भविष्यात भारताच्या हवाई अण्वस्त्र क्षमतेत अत्यंत मोलाची आणि निर्णायक भूमिका बजावतील.

भारत, अमेरिका, चीन आणि पाकिस्तान तुलना

भारताची हवाई अण्वस्त्र रचना इतर जागतिक महासत्तांपेक्षा वेगळी आहे:

अमेरिका : बी-२ आणि बी-२१ सारख्या स्टेल्थ बॉम्बर्स आणि प्रगत लढाऊ विमानांवर पूर्णपणे विसंबून आहे.

चीन : प्रदीर्घ पल्ल्याच्या 'एच-६' बॉम्बर विमानांवर आणि नव्या स्टेल्थ प्लॅटफॉर्म्सवर लक्ष केंद्रित करत आहे.

पाकिस्तान : प्रामुख्याने लढाऊ विमाने आणि जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भर देत आहे.

एकंदरीत पाहता, भारताने जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रे, पाणबुडीतून डागली जाणारी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने यांचा अचूक समतोल साधत स्वतःचे संरक्षण कवच अधिक अभेद्य बनवले आहे.

अण्वस्त्र वाहून नेणारी भारताची लढाऊ विमाने

हवाई हल्ल्याच्या दृष्टीने भारत सध्या दोन प्रमुख लढाऊ विमानांवर अवलंबून असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. १) मिराज २००० : फ्रान्सकडून खरेदी केलेल्या आणि वेळोवेळी आधुनिक प्रणालींनी सुसज्ज केलेल्या या विमानांचा वापर अण्वस्त्र हल्ल्यासाठी प्रमुख पर्याय म्हणून केला जातो. २) जग्वार : ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्तपणे विकसित केलेले हे लढाऊ विमान गेल्या अनेक दशकांपासून भारतीय हवाई दलात अण्वस्त्र वहनाचा दुसरा भक्कम पर्याय म्हणून कार्यरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news