

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी रोखण्याचे आश्वासन दिल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळून लावला. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
जयस्वाल यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, त्यांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात अलीकडे कोणतीही चर्चा झाल्याची माहिती नाही. ते म्हणाले, ‘काल दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही फोन कॉल किंवा चर्चा झाल्याची मला कोणतीही माहिती नाही.’ विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांना सांगितले होते की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.आमचे धोरण राष्ट्रीय हिताने प्रेरित आहे ट्रम्प यांच्या दाव्यानंतर जयस्वाल यांनी भारताचे ऊर्जा धोरण स्पष्ट करताना सांगितले की, भारताचे लक्ष नेहमीच आपल्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि ऊर्जेच्या किमती स्थिर ठेवण्यावर राहिले आहे. ते म्हणाले, ‘भारत तेल आणि वायूचा मोठा आयातदार देश आहे. आमचे धोरण राष्ट्रीय हिताने प्रेरित आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांना स्वस्त आणि सुरक्षित ऊर्जापुरवठा मिळावा, हे आमचे प्राधान्य आहे.’ त्यांनी पुढे सांगितले की, भारत आपली ऊर्जा खरेदी अधिक व्यापक करण्यासाठी आणि विविध स्रोतांमधून आयात वाढवण्यासाठी काम करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी म्हटले आहे की, तेल आयातीबाबतचे भारताचे निर्णय हे देशाच्या ‘राष्ट्रीय हिताने’ प्रेरित आहेत. भारत रशियन तेलाची आयात सुरू ठेवणार का, असे विचारले असता अलिपोव्ह म्हणाले, ‘हा प्रश्न भारत सरकारसाठी आहे. भारत सरकार सर्वप्रथम देशाच्या राष्ट्रीय हिताचा विचार करते आणि ऊर्जेतील आमचे सहकार्य त्या हितांशी पूर्णपणे सुसंगत आहे.’
रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर वारंवार टीका करणाऱ्या ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. अमेरिकेने भारतावर ही खरेदी थांबवण्यासाठी दीर्घकाळापासून दबाव टाकला आहे. सवलतीच्या दरातील रशियन तेलामुळे मॉस्कोला युक्रेनमधील युद्धासाठी निधी मिळवण्यास मदत होते, असा अमेरिकेचा युक्तिवाद आहे.