

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याबद्दल मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर थेट निशाणा साधला. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवून हे दोन्ही देश या युद्धाला प्राथमिक निधी पुरवणारे आहेत, अशी टीका करतानाच युरोपातील त्यांच्या मित्र राष्ट्रांनीही रशियाकडून तेल खरेदी तत्काळ बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी रशियाकडून होणारी सर्व ऊर्जा खरेदी त्वरित बंद केली पाहिजे; अन्यथा आपला बराच वेळ वाया जात आहे, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये परत आल्यानंतर संयुक्त राष्ट्रांवर पश्चिम देशांवर स्थलांतराच्या माध्यमातून ‘हल्ला’ घडवून आणल्याचा आरोप केला आणि सांगितले की, हे देश ‘नरकात’ जात आहेत. त्यांनी ‘खुल्ल्या सीमांचा अयशस्वी प्रयोग’ संपवण्याची वेळ आल्याचेही म्हटले. आपल्या भाषणात, ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांवर उपहासात्मक हल्ला चढवला. ही संस्था शांततेला मदत करत नाही, असे सांगून त्यांनी मुख्यालयाच्या इमारतीच्या गुणवत्तेची खिल्ली उडवली. संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे, हे मी नेहमीच म्हणत आलो आहे; पण ती क्षमता पूर्ण करण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी ग्लोबल वॉर्मिंगला जगातील सर्वात मोठी फसवणूक म्हटले आहे. त्यांच्या दुसर्या कार्यकाळात त्यांनी जागतिक सहकार्यावर निर्बंध घालणारी राष्ट्रवादी धोरणे आणली आहेत. अमेरिका जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या हवामान करारातून बाहेर पडली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी खूप निराशा केली; कारण त्यांच्या भेटीनंतरही युक्रेनवरील हल्ले सुरूच आहेत, असे ट्रम्प म्हणाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.