नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
हॉवर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका गीता गोपीनाथ यांची इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदी निवड करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर या मानाच्या पदावर विराजमान होणाऱ्या दुसऱ्याच भारतीय आहेत.
सध्या कार्यरत असलेले मॉरिस ऑब्स्टफेल्ड डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. गीता अमेरिकन नागरिक असून अनिवासी भारतीय आहेत. गीता यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.ए. आणि दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून तसेच वॉशिंग्टन विद्यापीठातून एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सन २००१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली.
गीता यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना मुख्य अर्थ सल्लागार म्हणूनही काम केले आहे. त्यांचे मल्ल्याळम भाषेवरही जबरदस्त प्रभुत्व आहे. गीता यांचे विविध विषयांवर ४० प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.