पुढारी ऑनलाईन डेस्क : शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देवून देश सोडून पलायन केल्यानंतर बांगला देशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. या अत्याचाराच्या निषेध करत आज शेकडो हिंदू नागरिक बांगला देशची राजधानी ढाका येथे रस्त्यावर उतरले. त्यांनी हिंसाचाराचा निषेध करत बांगलादेशी हिंदूंना वाचवा, अशी मागणी नवनियुक्त अंतरिम सरकारकडे केली.
बांगला देशमध्ये मागील पाच दिवसांहून अधिक काळ हिंदूच्या घरांवर हल्ले होत आहेत. अखेर आज शेकडो हिंदू बांधव या अत्याचाराविरोधात हातात फलक घेवून रस्त्यावर उतरले. त्यांनी हिंसाचाराचा निषेध केला तसेच "आम्ही कोण आहोत, बंगाली बंगाली" च्या घोषणा देत शांततेचे आवाहन करत ढाका शहरातील एका चौकात रस्ता रोको आंदाेलनही केले. यावेळी आंदोलकांनी बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांचे संरक्षण करा, अशी मागणी करणारे फलक हातात घेतले होते. या रास्ता राेकाेमध्ये तरुणींची संख्याही लक्षणीय हाेती.
बांगला देशमधील दोन हिंदू संघटनांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांना खुले पत्र लिहून देशात अल्पसंख्याकांविराेधात सुरु असलेल्या हिंसाचाराला वाचा फोडली आहे. बांगलादेशमध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन युनिटी कौन्सिल आणि बांगलादेश पूजा उज्जपन परिषद या गटांनी शुक्रवारी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांना लिहिलेल्या एका खुल्या पत्रात हिंसाचाराची सविस्तर माहिती सादर केली आहे.
सोमवार ५ ऑगस्टपासून बांगला देशमधील 52 जिल्ह्यांतील अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांवर किमान 205 हल्ले झाले आहेत, असे हिंदू संघटनांनी युनूस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
"आम्ही संरक्षण शोधत आहोत. आमचे जीवन संकटमय झाले आहे. आम्ही रात्री जागून काढत आहोत, आमच्या घरांचे आणि मंदिरांचे रक्षण करत आहोत. आम्ही आमच्या आयुष्यात असा हिंसाचार काधीही पाहिलेला नाही. परिस्थिती बिघडत चालली आहे.सरकारने देशात जातीय सलोखा बहाल करावा, अशीही मागणी या पत्रातून करण्यात आली आहे."
देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 230 हून अधिक लोक मारले गेले. जुलै महिन्यात बांगला देशमध्ये आरक्षणा विराेधात निदर्शने सुरू झाली. तेव्हापासून झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या 560 वर पोहोचली आहे.