बीजिंग : ह्युमनॉईड तंत्रज्ञानात चीनने मोठी झेप घेतली असली, तरी मानवाशी स्पर्धा करताना अजूनही बर्यापैकी अंतर ठेवावे लागत असल्याचे मानवी रोबोच्या अथॅलिटस् स्पर्धेतील सहभागावरून स्पष्ट झाले आहे.
या रोबोटनी यिझुआंगच्या टेक्नोलॉजी हबमधून 21 किलोमीटरची वळणावळणांची शर्यत पूर्ण केली. काही रोबोटनी सुरुवातीलाच नियंत्रण गमावले, तर काहींना मार्गक्रमण करताना बॅटरी बदलावी लागली. दरवेळी रोबोट बदलल्यास संघाला 10 मिनिटांची पेनल्टीही मिळत होती.
मागील काही महिन्यांपासून चीनच्या ह्युमनॉईड रोबोटचे बाईक राईड, राऊंडहाऊस किक आणि साईड फ्लिप यासारखे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मात्र, या मॅरेथॉनने इतके मात्र स्पष्ट केले की, मानव अजूनही पळण्यात तरी पुढे आहेत.
बीजिंगच्या यिझुआंग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या जगातील पहिल्या ह्युमनॉईड हाफ मॅरेथॉनमध्ये 20 हून अधिक दोन पायांच्या रोबोटनी सहभाग घेतला. मात्र, अद्याप तरी हे रोबोट मानवी धावपटूंना मागे टाकण्यात अपयशी ठरले. या शर्यतीत विविध कंपन्या आणि विद्यापीठांच्या संघांनी आपले रोबोट उतरवले होते.
सामान्य धावपटूंप्रमाणेच रोबोटनाही पाणी म्हणजे बॅटरी बदलून एनर्जी मिळवण्याची मुभा होती. 12,000 मानवी धावपटूंमध्ये रोबोटसाठी स्वतंत्र लेन राखण्यात आली होती.
मानवांच्या तुलनेत हे वेळेत खूपच मागे होते. शनिवारी झालेल्या पुरुष विभागाच्या विजेत्याने हाफ मॅरेथॉन केवळ 1 तास 2 मिनिटांत पूर्ण केली, तर जागतिक विक्रम 56 मिनिटे 42 सेकंदांचा आहे.