Christa Pike | मृत्युदंडासाठी दोन इंजेक्शन देऊनही महिला कैदी जिवंत

अमेरिकेतील प्रकरणाने खळबळ; फाशीची प्रक्रिया अर्धवट थांबली; चौकशीचे आदेश
 Christa Pike |
Christa Pike | मृत्युदंडासाठी दोन इंजेक्शन देऊनही महिला कैदी जिवंत
Published on: 
Updated on: 

टेनेसी; वृत्तसंस्था : अमेरिकेतील टेनेसी राज्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या क्रिस्टा गेल पाइक या महिला कैद्याला प्राणघातक इंजेक्शन देऊनही तिचा मृत्यू झाला नाही. दोन इंजेक्शन दिल्यानंतरही तिची हृदयाची धडधड सुरू होती आणि ती झोपेत असल्याचे सांगण्यात आले. या अनपेक्षित घटनेनंतर फाशीची प्रक्रिया थांबवण्यात आली असून, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या प्रशासनाने दिले आहेत. पाइकला १९९५ मध्ये १९ वर्षीय सहाध्यायी कोलीन स्लेमर हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. १९९६ मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी पाइकचे वय १८ वर्षे होते.

दोन इंजेक्शननंतरही मृत्यू नाही

फाशीच्या प्रक्रियेदरम्यान पाइकला स्ट्रेचरवर बांधण्यात आले होते. रात्री ७.२७ वाजता तिला पहिले इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर रात्री ८.२६ वाजता पेंटोबार्बिटलचे दुसरे इंजेक्शन देण्यात आले. मात्र, त्यानंतरही तिचा मृत्यू झाला नाही. रात्री ८.५३ वाजता तिचा मायक्रोफोन बंद करण्यात आला आणि उपस्थित साक्षीदारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पाइकच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात आपत्कालीन याचिका दाखल करून फाशीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. वकिलांच्या म्हणण्यानुसार, तिला पेंटोबार्बिटलची दोन इंजेक्शन्स दिली होती. मात्र, त्यानंतरही तिचे प्राण गेले नाहीत. टेनेसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनने मात्र न्यायालयाने मंजूर केलेल्या प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचे पालन केल्याचे म्हटले आहे.

नियमांमध्ये स्पष्टता नसल्याचा मुद्दा

मृत्युदंडाच्या प्रक्रियेत पहिल्या इंजेक्शननंतर कैद्याचा मृत्यू न झाल्यास दुसरे इंजेक्शन देण्याची तरतूद आहे. मात्र, दुसऱ्या इंजेक्शननंतरही कैदी जिवंत राहिल्यास पुढे काय करायचे, याबाबत राज्याच्या नियमांमध्ये स्पष्ट प्रक्रिया नसल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे.

यावर्षीच्या उर्वरित फाशींवर तात्पुरती स्थगिती

या घटनेनंतर टेनेसीच्या गव्हर्नरनी चौकशीचे आदेश दिलेत. तसेच यावर्षी राज्यात नियोजित इतर सर्व फाशीच्या शिक्षांवर तात्पुरती स्थगिती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news