Houthi Rebels | हुती बंडखोर बाब अल-मंदेबनजीक

Houthi Rebels |
Houthi Rebels | हुती बंडखोर बाब अल-मंदेबनजीक
Published on
Updated on

सना; वृत्तसंस्था : येमेनमधील हुती बंडखोरांनी लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आपली लष्करी पकड वेगाने मजबूत करण्यास सुरुवात केली असून आता त्यांची नजर बाब अल-मंदेब सामुद्रधुनीवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सामुद्रधुनीतील पेरिम बेटावरील नियंत्रण येमेनी सरकारी फौजांनी सोडून माघार घेतल्याचे वृत्त आहे. ‘रॉयटर्स’ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

पेरिम बेट हे बाब अल-मंदेब सामुद्रधुनीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बेटाच्या समोर असलेल्या धुबाब शहरातही हुती बंडखोर दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सागरी मार्गावर हुतींचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून हुती बंडखोर येमेनच्या लाल समुद्रकिनाऱ्यावर सातत्याने पुढे सरकत आहेत. त्यांनी मोखा या महत्त्वाच्या बंदर शहरासह अनेक रणनीतिक भागांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. आता त्यांची आगेकूच ताईज शहराच्या दिशेने सुरू आहे. गुरुवारी हुतींनी मोखा शहरावर नियंत्रण मिळवले. हे शहर बाब अल-मंदेब सामुद्रधुनीपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे लाल समुद्रातील त्यांच्या सामरिक स्थितीत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.

‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, मोखा ताब्यात घेण्याच्या मोहिमेत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌ने हुतींना लष्करी सल्ला आणि मदत दिल्याचा दावा केला आहे. मात्र, इराणने सार्वजनिकरीत्या हुतींना लष्करी निर्देश देत असल्याचे नाकारले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌चे काही वरिष्ठ कमांडर येमेनमध्ये उपस्थित असल्याचेही सांगितले जात आहे. त्यांनी सौदी अरेबियाविरुद्धच्या हुती हल्ल्यांचे नेतृत्व केल्याचाही दावा केला जात आहे.

बाब अल-मंदेब का महत्त्वाची?

बाब अल-मंदेब ही लाल समुद्र आणि अदनच्या आखाताला जोडणारी अरुंद सामुद्रधुनी आहे. आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेला जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली तर तेल आणि नैसर्गिक वायूच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवर आधीच दबाव आहे. अशा परिस्थितीत बाब अल-मंदेबमध्येही संकट निर्माण झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दुहेरी दबाव येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news