

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये रहिवासी इमारतींना लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा 75 वर पोहोचला असून, 279 जण अद्याप बेपत्ता आहेत. हाँगकाँगच्या इतिहासातील सर्वात भीषण अग्नितांडवांपैकी एक म्हणून ही घटना ओळखली जात आहे. दरम्यान, बांबू आणि प्लास्टिक शिटस्मुळे अग्निकांडाची दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्तहोत आहे.
चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, 68 जण रुग्णालयात दाखल असून, त्यापैकी 16 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर अन्य 25 जणांची प्रकृती गंभीर असली, तरी ते धोक्याबाहेर आहेत. पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, रहिवासी इमारतींवर लावलेल्या सुरक्षा जाळ्या, वॉटरप्रूफ कॅनव्हास आणि प्लास्टिकच्या शीटस्मुळे आग वेगाने भडकली आणि संपूर्ण ब्लॉकमध्ये पसरली. तसेच, खिडक्या सील करण्यासाठी अत्यंत ज्वालाग्राही असलेल्या पॉलियुरेथेन फोमचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना हाँगकाँगच्या ताई पो या उपनगरीय भागात घडली. स्थानिक प्रशासनानुसार, आग एका इमारतीत लागली होती; मात्र सायंकाळपर्यंत ती सात इमारतींमध्ये पसरली.
ही आग बुधवारी दुपारी सुमारे 2.50 वाजता लागली. या संकुलात आठ टॉवर्स असून, त्यात सुमारे 2,000 सदनिका (अपार्टमेंटस्) आहेत. या इमारतींमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते आणि त्यांना बांबूच्या परांचीने वेढण्यात आले होते. बांबू हे एक सहज पेट घेणारे साहित्य आहे. मागील वर्षी, अशाच एका घटनेत आग वेगाने पसरल्यानंतर अधिकार्यांनी बांबूच्या धोक्याबद्दल आधीच इशारा दिला होता. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी बांबूच्या परांचीने आगीचा भडका उडवण्यात मोठी भूमिका बजावली असल्याचा संशय व्यक्तकेला जात आहे.