पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हमासचा लष्करी नेता मोहम्मद देफ याचा खात्मा करण्यात आला आहे, अशी घोषणा इस्त्रायलच्या संरक्षण दलाने केली आहे. विशेष म्हणजे हमासचा नेता इस्माईल हनीयेह मारला गेल्याच्या एका दिवसानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
इस्त्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) गुरुवारी जाहीर केले की, १३ जुलै २०२४ रोजी खान युनिसच्या परिसरात इस्त्रायल संरक्षण दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला केला. या हवाई हल्ल्यात ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि हमासचा लष्करी नेता मोहम्मदथ देफ ठार झाला आहे. गुप्तचर विभागाने अधिकृत माहिती घेतल्यानंतर तो ठार झाला असल्याची पुष्टी केली जाऊ शकते."
मोहम्मद देफ हा इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे मानले जाते. त्याने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गाझा युद्ध सुरू झाले. तो अनेक दशकांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत अव्वल होता. हमासच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होता. बोगदे आणि बॉम्ब बनवण्यात त्याने विशेष कौशल्य विकसित केले होते.
इस्त्रायलने सातवेळा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रत्यन केला होता. मात्र तो प्रत्येकवेळी बचावला होता. ऑक्टोबर ७ नंतर काही महिन्यांत, तो वरिष्ठ सहकाऱ्यांसह गाझामधील बोगदे आणि मागच्या रस्त्यावरून लष्करी कारवाईचे निर्देश करत होता असे मानले जाते.