पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामधील ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धबंदी, अशी तरतूद असणार्या कराराचा मसुदा हमासने स्वीकारला आहे. मात्र इस्रायल अजूनही या करारावर विचार करत आहे, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे.
अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, इस्रायल आणि हमास युद्धबंदी कराराच्या जवळ आहेत. युद्ध संपवण्याची ही सर्वोत्तम संधी असू शकते. युद्धबंदीसाठीच्या या करारात कतार हा मुख्य मध्यस्थ आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धबंदी चर्चेत प्रगती झाल्याचे संकेत इस्रायलकडून रविवार, १२ जानेवारी रोजी मिळाले होते. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी त्यांच्या गुप्तचर संस्थेच्या 'मोसाद' संचालकांना युद्धबंदीच्या वाटाघाटींसाठीच्या पुढील टप्प्यातील चर्चेसाठी पुढे येण्याची परवानगी दिली होती.इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने नेतान्याहू यांचे हे पाऊल आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात होते.
टप्प्याटप्प्याने युद्धबंदीची चर्चा सुरु करण्याचे संकेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले होते. मात्र आम्ही फक्त पहिल्या टप्प्यातील चर्चेसाठी वचनबद्ध आहेत, एका आठवड्याच्या लढाईच्या विरामाच्या बदल्यात ओलिसांची अंशतः सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी हमासकडे केली असल्याचे वृत्त होते. मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशातून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार घेण्याचा आग्रहावर हमास ठाम होते. गुप्तचर संघटना मोसादच्या संचालकांना कतारमध्ये पाठवण्यास पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी परवानगी दिल्याने युद्धबंदीच्या वाटाघाटी सुरु हाेण्याचे संकेत मिळाले होते. दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने नुकतेच सांगितले की, युद्धात आतापर्यंत ४६,००० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मृतांत बहुतांश महिला आणि मुले आहेत.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्त्रायलचे १२०० नागरिक ठार झाले.सुमारे २५० लोकांना गाझामध्ये ओलीस ठेवले.यातील सुमारे १०० इस्त्रायली नागरिक अजूनही गाझामध्ये आहेत. लवकरात लवकर युद्धबंदीच्या वाटाघाटी पूर्ण करुन ओलीसांच्या सुटका करावी, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय नेतन्याहू यांच्याकडे करत अहेत. दरम्यान, हमासने म्हटले आहे की, अनेक महिन्यांच्या युद्धानंतर किती ओलीस जिवंत आहेत हे निश्चित नाही. इस्रायलच्या लष्कराने शनिवारी उत्तर गाझामध्ये चार सैनिकांच्या मृत्यूची घोषणा केली, परंतु तपशीलवार माहिती दिली नाही. या युद्धात किमान ४०० सैनिक मारले गेले आहेत. इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील हवाई हल्ले वाढवले आहेत. इस्रायली सैन्याने युद्धादरम्यान १७,००० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.