

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या नव्या सोशल मीडिया पडताळणी धोरणामुळे भारतातील ‘एच-1 बी’ व्हिसा अर्जदारांना मोठा फटका बसला आहे. कारण, त्यांच्या अनेक मुलाखती पुढील वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतातील अमेरिकन दूतावासाने मंगळवारी रात्री व्हिसा अर्जदारांसाठी एक सूचना जारी केली. या निर्णयाचा भारतीयांसह 85 हजार व्हिसाधारकांना फटका बसणार आहे. तुम्हाला तुमच्या व्हिसा मुलाखतीची तारीख बदलण्यात आल्याचा ई-मेल मिळाला असेल, तर भारतातील अमेरिकन मिशन तुम्हाला तुमच्या नवीन मुलाखतीच्या तारखेला मदत करण्यास उत्सुक आहे, असे या सूचनेत म्हटले आहे.
दूतावासाने असाही इशारा दिला आहे की, ज्या अर्जदारांना मुलाखतीची तारीख बदलल्याचे कळवण्यात आले आहे, त्यांनी जुन्या तारखेला दूतावासात आल्यास त्यांना प्रवेश नाकारला जाईल. तुमच्या पूर्वीच्या नियोजित मुलाखतीच्या तारखेला आल्यास तुम्हाला दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात प्रवेश नाकारला जाईल, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौर्यानंतर अमेरिकेने व्हिसासंदर्भात कठोर उपायोयना केल्या आहेत. अवैध स्थलांतर आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ट्रम्प प्रशासनाने स्थलांतर धोरण अधिक कठोर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिकेत ये-जा करणार्या व्यक्तींवर अधिक तपासणी करण्याच्या उद्देशाने नव्या कठोर उपाययोजना राबविल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिसा रद्दीकरणाची आकडेवारी जाहीर केली.
अमेरिकन सरकारने एच-1 बी व्हिसा अर्जदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या एच -4 व्हिसाधारकांसाठी तपासणी आणि पडताळणीचे उपाय अधिक कठोर केले आहेत. यानुसार, अर्जदारांना त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलच्या प्रायव्हसी सेटिंग्ज ‘पब्लिक’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 15 डिसेंबरपासून अधिकारी त्यांच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवतील, जेणेकरून अपात्र किंवा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला वा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणार्या व्हिसा अर्जदारांना ओळखता येईल. विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर्ससाठी अशी तपासणी आधीपासूनच लागू होती.