पुढारी ऑनलाईन डेस्क : जगाचे लक्ष वेधलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करार आज (दि. १९) सुमारे तीन तासांच्या विलंबानंतर लागू झाला, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे. दरम्यान, कराराच्या अंमलबजावणीत तीन तास झालेल्या विलंबास इस्रायलने हमासला जबाबदार ठरवले आहे. इस्रायलने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:१५ वाजता युद्धबंदी करार लागू झाला. दरम्यान, हमासने ओलिसांची नावे देण्यास विलंब केलेल्या वेळेत गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील सहा आठवड्यांच्या युद्धबंदीचा पहिला टप्पा रविवारी सकाळी ८.३० वाजता लागू होणार होता. करार अंमलात येण्यापूर्वी, इस्रायलने स्पष्ट केले होते की, हमासओलिसांची नावे सुपूर्द करत नाही तोपर्यंत युद्धबंदी सुरू होणार नाही. दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे नावे सादर करण्यास विलंब झाल्याचे हमासने म्हटले आहे. तीन तासांनंतर, हमासने तीन ओलिसांची नावे इस्रायलला सोपवली. त्यात तीन महिलांची नावे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला ओलीस ठेवण्यात आले.
हमासकडून नावे मिळण्यास विलंब होत असताना, इस्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. दक्षिण गाझा शहरातील खान युनूस येथील नासेर रुग्णालयाने हल्ल्यातील मृतांची पुष्टी केली. इस्रायलने म्हटले आहे की हमासने सुटका करायच्या असलेल्या ओलिसांची नावे उघड न करून युद्धविराम सुरू होण्यास विलंब केला. युद्धबंदी सुरू झाल्यानंतर सुमारे दोन तासांनी हमासने नावे सुपूर्द केली.
या कराराअंतर्गत हमास पहिल्या टप्प्यात ३३ बंधकांना सोडेल आणि त्या बदल्यात इस्रायल ७०० पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करेल. या करारामुळे, दोन्ही पक्ष त्यांच्या सर्वात प्राणघातक आणि विनाशकारी संघर्षाच्या समाप्तीच्या दिशेने एक पाऊल जवळ येत आहेत.
गाझामध्ये युद्धबंदी करार होण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला होता. इस्रायलला युद्ध पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आहे, असे इस्रायलने म्हटले होते. हमासकडून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी मिळत नाही तोपर्यंत ते करारावर पुढे जाऊ शकणार नाहीत. इस्रायल कराराचे कोणतेही उल्लंघन सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.. गरज पडल्यास, इस्रायल अमेरिकेच्या पाठिंब्याने पुन्हा युद्ध सुरू करू शकतो. आम्हाला सर्व बंधकांना आधी इस्रायलमध्ये परत आणायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक भागांना एकाचवेळी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली नागरिक ठार झाले. तर २५० हून अधिक जणांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आले. यानंतर इस्रायलने गाझावर भीषण हल्ल्यांची मालिकाच सुरु केली. इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पूर्णत: बेचिराख झाले आहे. येथील सुमारे ९० टक्यांहून अधिक लोकसंख्या ही विस्थापित झाली आहे. निवारा छावणीत हजारो पॅलेस्टिनी नागरिक नरक यातना भोगत आहेत.
इस्रायल-हमास यांच्या संघर्षवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र दोन्ही बाजूंनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे शांततेला छेद बसत होता. अखेर मागील काही दिवसांपूर्वी कतार आणि अमेरिकेने पुन्हा एकदा इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करार सुरू केला. कतारने युद्धात मध्यस्थी केली करत सर्वप्रथम २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत आठवडाभरासचाठी युद्धबंदी लागू केली. नोव्हेंबरमध्ये कतारनेही चर्चेतून माघार घेतली. इस्रायल आणि हमास वाटाघाटी करण्यास तयार नसल्याचा आरोप कतारने केला होता. मात्र तरीही शांततेसाठीचे प्रयत्न सुरूच होते. अखेर अमेरिकेनेही युद्धबंदीवर करार करण्याचा आग्रह धरला. अमेरिकेत सत्तांतर झाले. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हमासला ओलिसांना लवकर सोडावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराच त्यांनी दिला. याचा परिणाम झाला. हमासने नमते घेत सर्वप्रथम युद्धबंदी करारावर सहमती दर्शवली. यानंतर इस्त्रायलनेही याला संमती दिल्यानंतर अखेर युद्धबंदी करार शक्य झाला.
हमासने टप्प्याटप्प्याने डझनभर ओलिसांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे. तर इस्रायलने त्यांच्या ताब्यातून शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यासही सहमती दर्शविली आहे. या करारावर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, ' आठ महिन्यांच्या सततच्या वाटाघाटींनंतर प्रशासनाला युद्धबंदी आणि ओलिस करारावर सहमती मिळवण्यात यश आले आहे. हा करार तीन टप्प्यात अंमलात आणला जाईल. युद्धबंदी कराराबाबत कतार, इजिप्त आणि अमेरिकेने बुधवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या कराराची अंमलबजावणी १९ जानेवारी २०२५ पासून लागू होईल आणि तीन टप्प्यात शांतता प्रस्थापित करण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत एकत्र काम करून ही प्रक्रिया यशस्वी करण्याचे आश्वासन कतार, इजिप्त आणि अमेरिकेने दिले आहे.
कराराचा पहिला टप्पा सहा आठवड्यांचा असेल. यामध्ये पूर्ण युद्धबंदी असेल. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, करारानुसार पहिल्या टप्प्यात हमास ओलिसांना सोडेल. इस्रायलही पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडेल. मात्र त्यांनी नेमकी किती ओलिसांची सुटका होणार आहे याबाबतची माहिती दिलेली नाही. पहिल्या टप्प्याची अटीची अंमलबजवणी झाल्यानंतर इस्रायलचे काही सैन्य गाझामधून माघार घेईल. पॅलेस्टिनी देखील गाझामध्ये परततील. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या होतील. सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागला तरी युद्धबंदी सुरूच राहील, असेही ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.
सहा आठवड्यांत होणाऱ्या चर्चेत इस्रायल आणि हमासमध्ये अनेक मुद्द्यांवर एकमत होईल. युद्धाबंदी कायमसाठी होईल. इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल, तर हमासकडून ओलिस ठेवलेल्या इस्त्रायलच्या नागरिकांची सुटका होईल. इस्रायली सैन्य गाझामधून पूर्णपणे माघार घेईल. तात्पुरता असणारा युद्धविराम कायमचा होईल.
तिसर्या टप्प्यात ओलिसांचे मृतदेह सुपूर्द केले जातील. तसेच आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली तीन ते पाच वर्षांच्या पुनर्बांधणी योजनेचे आयोजन केले जाईल. गाझा पुनर्बांधणीसाठी अनेक वर्ष लागू शकतात. ज्यांनी चर्चेचे निरीक्षण केले त्यांना माहित होते की कराराचा मार्ग सोपा नव्हता. हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण संभाषणांपैकी एक आहे. मला वाटतं अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलने हमासवर दबाव आणला, असेही बायडेन यांनी म्हटलं आहे.