पुढारी ऑनलाईन डेस्क : फरार हिरेव्यापारी आणि १३,८५० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) या भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनंतर बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मेहुल चोक्सी विरुद्ध मुंबईतील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्याला आता अटक केली आहे.
पीएनबी बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी देश सोडून पळाला होता. २०१८ पासून फरार असलेल्या चोक्सीला १२ एप्रिल रोजी बेल्जियममधील एका रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले. तो तिथे उपचार घेत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाबाबत प्रयत्न केल्यानंतर काही दिवसांताच त्याला अटक करण्यात आली. ईडी आणि सीबीआयने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी जोर लावल्यानंतर लगेचच प्रकृती बिघडल्याचे कारण देत तो युरोपला गेला होता, असे सूत्रांनी सांगितले. बेल्जियम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो रुग्णालयात उपचार घेत होता.
सध्या त्याला बेल्जियममधील एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचे बेल्जियमध्ये वास्तव्य आहे, असेही सूत्रांनी सांगितले. काही रिपोर्टनुसार, त्यांची प्रकृती खालावली चालली असून त्यांच्यावर रक्ताच्या कर्करोगावर उपचार सुरू आहेत. जेव्हा चोक्सीला अटक करण्यात आली तेव्हा तो पुढील वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमहून स्वित्झर्लंडला जाण्याचा तयारीत होता. सप्टेंबर २०२४ मध्ये ईडी आणि सीबीआयने प्रत्यार्पणासाठी विनंती अर्ज सादर केल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यावेळी, चोक्सीच्या वकिलांनी असा दावा केला की तो रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त असून त्याला प्रवास करता येणार नाही.
मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, चोक्सी आता आपला बचाव करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत आहे. त्याच्या वकिलांनी असा दावा केला आहे की त्याच्या प्रत्यार्पणाला विरोध करण्यासाठी वैध कारणे आहेत. त्यात त्याची आरोग्याची स्थिती हे एक कारण आहे.
बंगळूर येथील उद्योजक हरीप्रसाद एस व्ही यांनी २०१६ मध्ये मेहुल चोक्सीच्या कथित गैरव्यवहाराबद्दल पीएमओला माहिती दिली होती. आता चोक्सीच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना हरिप्रसाद एसव्ही म्हणाले, " चोक्सीला अटक होणे ही खूप चांगली बातमी आहे. भारतात मेहुल चोक्सीने ज्या लोकांना फसवले त्या सर्व लोकांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याला बेल्जियममध्ये कसे पकडले, हे अविश्वसनीय आहे. त्याला केवळ भारतात परत आणणेच नव्हे तर त्याने लुटलेले पैसेदेखील परत मिळवणे महत्त्वाचे आहे, भारताला याचीच गरज आहे."
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत १३,८५० कोटींच्या (PNB loan fraud case) घोटाळ्याचा आरोप आहे. यापूर्वी, चोक्सीने त्याचा पासपोर्ट निलंबित झाल्यामुळे तो भारतात येऊ शकत नसल्याचे कारण पुढे केले होते. त्याने २०१८ मध्ये भारतातून पळून जाण्यापूर्वी २०१७ मध्येच अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. मेहुलने प्रकृती बिघडल्याचे कारण देत भारतात येण्यास वारंवार नकार दिला आहे. कधीकधी तो केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समोर येतो. भारतातील त्याच्या अनेक मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.