

पुढारी ऑनलाईन डेस्क : गंभीर गुन्ह्यांमधील दोषीसाठी फाशीची शिक्षा योग्य की अयोग्य, यावर अनेक देशांमध्ये आजही चर्चा होते. सुमारे ७० टक्के देशांत मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद नाही. जगातील १९३ देशांपैकी केवळ ३५ देशांमध्येच फाशीची शिक्षा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. यामध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्यात हत्येचा दोषी ठरलेल्या ब्रॅड सिग्मन (६७) याला गोळ्या झाडून मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. मागील पंधरा वर्षांत अमेरिकेत अशा पद्धतीने मृत्युदंड देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यासंदर्भातील वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. ( Death sentence in US)
ब्रॅड सिग्मन (६७) याने २००१ मध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेच्या आई-वडिलांचा ग्रीनव्हिल येथील त्यांच्या घरात खून केला होता. या दोघांवर त्याने बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला होता. तसेच महिलेच्या मुलीचे अपहरण केले होते. या प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मात्र ते फेटाळण्यात आले होते.
सिग्मनच्य वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला देण्यात येणार्या फाशीची शिक्षा कशी असावी याची निवड सिग्मन याने केली होती. इलेक्ट्रिक खुर्चीत शॉक किंवा प्राणघातक इंजेक्शनचा पर्याय त्याने नाकारला होता. त्याने गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती. १५ फूट अंतरावरून एकाच वेळी तीन बंदूकधारींनी त्याच्यावर गोळीबार केला. सुमारे ९० सेकंदांनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दक्षिण कॅरोलिनामध्येही मृत्युदंडाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सिग्मनला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेपूर्वी निदर्शकांचा एक गट तुरुंगाबाहेर जमला होता. निदर्शकांनी हातावर 'प्रत्येक जीव मौल्यवान आहे' आणि 'खून नाही तर न्याय' अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.