

पॅरिस/न्यूयॉर्क: फ्रान्समध्ये गेल्या महिन्यात उसळलेल्या हिंसक दंगली आणि जनक्षोभाचा वापर करून युरोपीय देशांमध्ये फूट पाडण्याचा आणि फ्रान्स सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे.
एका गोपनीय युरोपीय युनियन अहवालानुसार, रशियाच्या एका गुप्त नेटवर्कने सोशल मीडियाच्या माध्यमातून या दंगलींचे खापर अनिर्बंध स्थलांतरावर फोडत फ्रेंच सरकारचे परिस्थितीवरील नियंत्रण सुटल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला.
फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या आणखी एका अंतर्गत अहवालानुसार, केवळ रशियन गटच नव्हे, तर इस्रायलशी संबंधित खाती आणि अमेरिकेतील ‘मागा’ चळवळीशी संबंधित हँडल्सनीही या दंगलींभोवती विघातक कथानके पसरवली.
या घटकांनी फ्रान्समधील असंतोषाचा संबंध थेट कट्टरतावादी इस्लामिक विचारसरणी आणि स्थलांतरितांशी जोडला. फ्रान्समधील वाढती महागाई आणि ढासळत्या सार्वजनिक सेवांच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू झाली होती. मात्र बाह्य घटकांनी राजकीय फायद्यासाठी या परिस्थितीचा गैरवापर केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
‘ऑपरेशन ओव्हरलोड’च्या माध्यमातून खोट्या व्हिडीओंचा भडिमार
युरोपीय युनियनच्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे की, ‘ऑपरेशन ओव्हरलोड’ या रशियन नेटवर्कने पाश्चात्त्य वृत्तवाहिन्यांची बनावट रूपे तयार करून दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसारित केले.
यामध्ये निदर्शकांवर स्थलांतरितांनी अत्याचार केल्याचे किंवा देशात दहशतवादी हल्ले होणार असल्याचे खोटे दावे करण्यात आले. तज्ज्ञांच्या मते, हे नेटवर्क एआय जनरेटेड ऑडिओ, बनावट मथळे आणि फेरफार केलेल्या छायाचित्रांचा वापर करून लोकांमध्ये भीती आणि अविश्वास निर्माण करते.
‘मागा’, इस्रायली पोस्ट्सना कोट्यवधी व्ह्यूज
फ्रेंच अहवालानुसार, १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान रशिया समर्थक खात्यांवरील पहिल्या १० पोस्टस्ना २८ लाख व्ह्यूज मिळाले. मात्र, या तुलनेत ‘मागा’ चळवळ आणि इस्रायली खात्यांवरील पोस्टस्चे प्रमाण प्रचंड होते.
‘मागा’शी संबंधित त्यांवरील शीर्ष १० पोस्टस्ना तब्बल ४.९ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले, तर इस्रायली अधिकृत व प्रभावशाली व्यक्तींच्या पोस्टस्ना ३.५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले