

दुबई/तेल अवीव; वृत्तसंस्था : दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात सहवैमानिकाने हवेतच मुख्य वैमानिकावर कॉकपिटमधील आपत्कालीन कुऱ्हाडीने अनेक वार करून विमानाचे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. हम्माम अल-हम्मामी हा सहवैमानिक दहशतवादी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचे संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. त्यांनी या घटनेला अधिकृतपणे ‘दहशतवादी हल्ला’ ठरवले आहे.
दरम्यान, ९/११ सारखा आत्मघाती दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचल्याचे या सहवैमानिकाने तपास अधिकाऱ्यांकडे कबूल केले आहे. विमानात हल्ला झाल्यानंतर ते दहशतवादी कृत्य असल्याचा संशय प्रथमपासून व्यक्त केला जात होता. संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या तपासात त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा दहशतवादी कटच होता. सहवैमानिक हा दहशतवादीच होता. त्याच्या समाजमाध्यमांतील खात्यांवर ‘अल कायदा’शी संबंधित लोकांचे फोटो आहेत. विमानाच्या कॉकपिटमधील व्हिडीओही त्याने समाजमाध्यमांमध्ये अपलोड केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या कट्टरवादी विचारसरणीमुळे त्याचा वैमानिक परवाना निलंबित केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ९/११ सारखा हल्ला घडवत इस्रायलमध्ये हे विमान पाडून नरसंहार घडवण्याचा हा कट होता, असे हम्मामने तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
हल्ल्यादरम्यान विमान अवघ्या ३० सेकंदांत तब्बल १६,००० फुटांपर्यंत खाली कोसळले. मात्र, जखमी कॅप्टन, प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी प्रसंगावधान राखून ओमानच्या आरोपी सहवैमानिकाला जागीच पकडून ठेवले. विमानात प्रवास करणाऱ्या एका राखीव वैमानिकाने तातडीने विमानाची सूत्रे हातात घेतली आणि सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करून १७० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले.