इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन
भारताने पूर्वकल्पना न देताच मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असा कांगावा पाकिस्तानने आता चालवला आहे. पाकच्या सिंधू जलआयोगाने म्हटले आहे की, सतलज नदीत आतापर्यंत 24 हजार क्युसेकने पाणी सोडले आहे, त्यामुळे पाकिस्तानात महापुराची स्थिती निर्माण होऊ शकते. सिंधू जल कराराबाबत पाकने चिंताही व्यक्त केली आहे.
पाकच्या जलआयोगाच्या सूत्रांनुसार सोमवारी सायंकाळी सात वाजता भारताने सतलज नदीत 24 हजार क्युसेकने पाणी सोडले. हेराईक आणि फिरोजपूर बॅरेजमधून 1 लाख 50 हजार क्युसेकने पाणी सोडले गेले. तर सतलजमधील सांडवाही 2 लाख क्युसेकने वाढवला जाऊ शकतो. याची पूर्वकल्पना भारताने दिली नाही. हे पाणी पाकिस्तानात कधीही पोहोचू शकते आणि त्यामुळे पूरस्थिती उद्भवू शकते.
पाकचे जलसंसाधनमंत्री फैजल वावडा यांनी म्हटले आहे की, करारानुसार भारताने पाकिस्तानात पूर येण्याआधी सूचना देणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार आग्रह करून आणि आठवण करून देऊनही त्यानुसार काम होत नाही. भारत करार पाळणार नसेल, तर पाकिस्तान जागरूक आहे आणि सर्व पर्यायांचा वापर करण्यास समर्थही आहे. दोन्ही देश करारात संशोधन किंवा बदल करत नाहीत तोपर्यंत दोन्ही देश हा करार तोडू शकत नाहीत, अशी तरतूद आहे.
पाकमधील आयुक्त सैय्यद मेहर अली शाह यांनी प्रसारमाध्यमांत म्हटले आहे की, भारतीय समकक्ष अधिकार्याशी सातत्याने बोलणे होत आहे. तथापि, पुराबाबत माहितीसह इतर तीन मुद्यांबाबत माहिती देण्यात आणि जबाबदारी पाळण्यात ते इच्छुक नाहीत. गंडा सिंह वाडा गावात पाणीपातळी 16-17 फूट झाली आहे. तथा पुरस्थितीचा इशारा दिला गेला आहे.