

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सॲपची (WhatsApp) पेरेंट कंपनी मेटा सुमारे ३,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची (Meta lay off) योजना आखली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची असमाधानकारक कामगिरी आहे; अशांना मेटा कामावरून कमी करणार असल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. त्यासाठी ब्लूमबर्गने अंतर्गत मेमोचा हवाला दिला आहे.
मेटा आता एआय-संचालित सेवा (AI-powered) आणि इमर्सिव्ह डिव्हाइसेस तयारीच्या दिशेने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत मेटामधील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका बसला आहे. दरम्यान, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी, ही नोकरकपात म्हणजे कामगिरी व्यवस्थापनाचा दर्जा वाढवणे आणि असमाधानकारक कामगिरी करणाऱ्यांना त्यातून लवकर बाहेर काढण्यासाठी हे उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
या नोकरकपातीचा मेटाच्या सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. मेटाच्या कर्मचाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये ७२,४०० होती. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना या घडामोडीबाबत १० फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत सूचना मिळण्याची शक्यता आहे, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
"हे वर्ष खूप कठीण असेल आणि मला याची खात्री करायची आहे की आमच्या टीममध्ये सर्वोत्तम लोक असतील," असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
"आम्ही साधारणपणे वर्षभरात अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या लोकांना काढून टाकतो," असे झुकरबर्ग यांनी सांगितले. "आता आम्ही या फेरीदरम्यान कामगिरीवर आधारित अधिक व्यापक नोकरकपात करणार आहोत." असेही त्यांनी नमूद केले आहे. याआधीच्या फेरीत काही असमानधारक कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संभाव्य योगदानावर विश्वास दर्शविल्यास त्यांना कामावर कायम ठेवले जाऊ शकते. नोकरकपातीमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.