

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तसंस्था 'डॉन'ने (DAWN) दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बॉम्ब निकामी पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
या अपघाताची चौकशी सध्या करण्यात येत आहे. असे सांगितले जात आहे की, क्वेटा येथे दोन बॉम्बस्फोट झाले. एका स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या स्फोटात सुमारे 15 जण जखमी झाले. हा बॉम्बस्फोट कोणी आणि का केला, याचा तपास सुरू आहे. सद्यस्थितीत या अपघाताची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही, तेव्हा याठिकाणी एक पॅसेंजर ट्रेन येणार होती आणि एक पॅसेंजर ट्रेन येणार असल्याने स्थानकावर खूप गर्दी होती. स्फोटानंतर क्वेटा रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. तेथे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा जोरदार बॉम्बस्फोट होता. मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस भिंडीच्या दिशेने जात असताना मोठा स्फोट झाला.
पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांच्या बातम्या नेहमीच येतात. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्येही बॉम्बस्फोट झाले होते. पाकिस्तानच्या अशांत उत्तर वझिरीस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार सुरक्षा कर्मचारी ठार तर अनेक जखमी झाले. याशिवाय खैबर पख्तुनख्वामध्ये एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी, याच्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पाच शाळकरी मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. बाईकमध्ये आयईडी टाकून हा स्फोट घडवण्यात आला. या घटनेनंतर क्वेटाच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.