Europe Heatwave | युरोपला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; फ्रान्समध्ये ५८ जणांचा मृत्यू

अणुऊर्जा प्रकल्पही बंद
Europe Heatwave |
Europe Heatwave | युरोपला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; फ्रान्समध्ये ५८ जणांचा मृत्यू
Published on
Updated on

पॅरिस/लंडन; वृत्तसंस्था : युरोप सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, फ्रान्समध्ये उष्माघात आणि पाण्यात बुडाल्याच्या घटनांमुळे आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे फ्रान्समधील गोलफेश अणुऊर्जा प्रकल्प तात्पुरता बंद करावा लागला असून, युरोपातील तब्बल २६ देश उष्णतेच्या विळख्यात सापडले आहेत. फ्रान्स, इटली, ब्रिटन, स्पेनसह १४ देशांनी रेड अलर्ट जारी केला आहे.

फ्रान्समध्ये उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर नद्या, तलाव आणि कालव्यांमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये ४० जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन लहान मुलांसह १८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची वेळ

फ्रान्समधील गोलफेश अणुऊर्जा प्रकल्पाला थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅरोन नदीचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने पर्यावरणीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला.

२००३ च्या भीषण लाटेची आठवण

२००३ मध्ये १६ दिवस उष्णतेमुळे फ्रान्समध्ये सुमारे १५ हजार, तर युरोपमध्ये जवळपास ८० हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

ब्रिटनमध्ये ५० वर्षांचा विक्रम धोक्यात

ब्रिटनमध्ये तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे झाल्यास १९७६ मध्ये नोंदवलेला जून महिन्यातील ३५.६ अंशांचा विक्रम मोडला जाईल. हवामान विभागाने 'रेड एक्स्ट्रीम हीट वॉर्निंग' जारी केली असून आरोग्य, वाहतूक आणि सार्वजनिक सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

‘हीट डोम’ आणि ‘ओमेगा ब्लॉक’ कारणीभूत

हवामानतज्ज्ञांच्या मते, युरोपमधील या विक्रमी उष्णतेमागे ‘हीट डोम’ आणि ‘ओमेगा ब्लॉक’ या हवामानशास्त्रीय घटना प्रमुख कारणीभूत आहेत. या परिस्थितीत उष्ण हवा जमिनीवरच अडकून राहते आणि तापमान सतत वाढत जाते. त्यातच एल निनोचा प्रभाव आणि जागतिक तापमानवाढ यामुळे उष्णतेची तीव्रता आणखी वाढली आहे.

एसी नसल्याने वाढली अडचण

तज्ज्ञांच्या मते, युरोपमधील केवळ २० टक्के घरांमध्ये वातानुकूलन (एसी) सुविधा उपलब्ध आहे. अमेरिकेत हे प्रमाण सुमारे ९० टक्के आहे. त्यामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेचा युरोपीय नागरिकांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत आहे. उष्माघात, शरीरातील पाण्याची कमतरता, हृदयविकार आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

हवामान बदलाचे गंभीर संकेत

तज्ज्ञांच्या मते, कोळसा, तेल आणि वायूच्या वाढत्या वापरामुळे जागतिक तापमान वाढत असून उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार, अधिक काळ आणि अधिक तीव्रतेने अनुभवायला मिळत आहेत.

१,३५० शाळा बंद

फ्रान्सच्या हवामान विभागाने देशातील काही भागांत तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा इशारा दिला आहे. १९४७ पासूनच्या नोंदींमध्ये यंदाची रात्र सर्वाधिक उष्ण ठरल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर १,३५० हून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

इटली, स्पेन, जर्मनीही संकटात

इटलीतील रोम, मिलानसह १५ शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्पेनमध्ये अनेक भागांत तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. काही भागांत रात्रीचे तापमानही ३० अंशांच्या वर आहे. जर्मनीत उष्णतेमुळे नागरिक जलाशयांकडे वळत असून गेल्या आठवड्यात पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बेल्जियममध्येही इतिहासातील सर्वात तीव्र उष्णतेची लाट अनुभवण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news