पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क आता टिकटॉक ॲप देखील खरेदी करतील, असे वृत्त समोर आले होते. आता खुद्द मस्क यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
WELT ग्रुप हा जर्मन मीडिया कंपनी अॅक्सेल स्प्रिंगर एसईचा भाग आहे. जानेवारीच्या अखेरीस मस्क यांनी टिकटॉक संदर्भात केलेल्या टिप्पण्या शनिवारी द वेल्ट ग्रुपने ऑनलाइन प्रसिद्ध केल्या. WELT ग्रुपने एक शिखर परिषद आयोजित केली ज्यामध्ये मस्क व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले हाेते की, "मी टिकटॉकवर बोली लावली नाही."
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की,र मस्क यांना टिकटॉक खरेदी करायचे असेल तर ते त्यासाठी तयार आहेत. यावर मस्क यांनी स्पष्ट केले होतं की, "माझ्याकडे टिकटॉक आल्यानंतर मी काय करेन याबद्दल माझ्याकडे कोणतीही नियाजन नाही. मी वैयक्तिकरित्या टिकटॉक वापरत नाही आणि ॲपच्या फॉरमॅटशी परिचित नाही. मला टिकटॉक खरेदी करायला आवडणार नाही, मी सहसा कंपन्या खरेदी करत नाही, ही एक दुर्मिळ गोष्ट आहे."
मस्क म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी ही देखील एक असामान्य घटना होती. ट्विटर आता Xझाले आहे. मी कोणतीही कंपनी शून्यातून सुरू करतो . मस्कने ट्विटर खरेदीभोवती असलेल्या अनोख्या परिस्थितीची कबुली दिली. तसेच "ट्विटर खरेदी करणे होते कठीण आणि वेदनादायक होते, असेही स्पष्ट केले होते.
एप्रिल २०२४ मध्ये एक विधेयक मंजूर झाल्यामुळे अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यानुसार, टिकटॉकची मालकी असलेली चिनी कंपनी बाइटडान्सला त्यापासून वेगळे होण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या वर्षी जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी बायडेन प्रशासनाच्या आदेशानुसार अमेरिकेत टिकटॉकची सेवा बंद करण्यात आली होती; पण राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर टिकटॉकवरील बंदी आदेशाची अंमलबजावणी ७५ दिवसांसाठी पुढे ढकलली आली होती. टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सला अमेरिकेत भागीदार शोधण्यासाठी अधिक वेळ देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अमेरिकेत टिकटॉकची सेवा पूर्ववत करण्यात आली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होती, ते टिकटॉक खरेदी करण्याबाबत अनेक लोकांशी चर्चा करत आहेत. या महिन्यात ते अॅपच्या भविष्याबाबत निर्णय घेतील. टिकटॉकचे सुमारे १७ कोटी अमेरिकन वापरकर्ते आहेत. ट्रम्प यांनी अलिकडेच एका वर्षाच्या आत एक सार्वभौम संपत्ती निधी तयार करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यावरुन असे मानले जात आहे की, सरकारचा हा निधी संभाव्यतः टिकटॉक खरेदी करू शकतो.