

इस्लामाबाद; पीटीआय : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या अचूक लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेतृत्वामध्ये घबराट पसरली होती. भारताने हवाई व ड्रोन हल्ले सुरू केल्यामुळे परिस्थिती गंभीर असताना बंकरमध्ये आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, अशी कबुली पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दिली.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना झरदारी म्हणाले की, जेव्हा भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत हवाई हल्ले सुरू केले, तेव्हा त्यांच्या लष्करी सचिवांनी त्यांना सावध केले होते की, युद्ध सुरू झाले आहे. पहलगाम येथे 26 नागरिकांच्या हत्येचा बदला म्हणून भारताने ही कारवाई केली होती. माझे मिलिटरी सेक्रेटरी माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘सर, युद्ध सुरू झाले आहे. चला आपण बंकरमध्ये जाऊया.’ मात्र हा सल्ला मानण्यास आपण नकार दिल्याचे झरदारी यांनी सांगितले.
भारताने 80 ड्रोन डागल्याने विमानतळांची हानी ः दार
भारताने रावळपिंडीतील नूर खान एअर बेसला लक्ष्य केल्याचेही पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले. भारताने पाकिस्तानच्या दिशेने ड्रोन पाठवले होते. 36 तासांच्या कालावधीत किमान 80 ड्रोन डागण्यात आले होते. यामध्ये रावळपिंडीतील नूर खान एअरबेसची हानी झाल्याचे त्यांनी मान्य केले.