

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईत अमली पदार्थ घेऊन देशात येणार्या एका पाणबुडीला लक्ष्य करण्यात आले असून, या कारवाईत दोन नार्को-दहशतवादी ठार झाले आहेत. इतर दोन संशयित जिवंत असून त्यांना त्यांच्या मूळ देशात, म्हणजे इक्वाडोर आणि कोलंबिया येथे कायदेशीर कारवाईसाठी परत पाठवले जाईल.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर दिलेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरात असलेल्या मार्गावरून अमेरिकेकडे येत होती. त्यात मोठ्या प्रमाणात फेन्टॅनिल आणि इतर अवैध अमली पदार्थ होते. ‘हे मोठे ड्रग्स घेऊन येणारे जहाज उद्ध्वस्त करणे हा माझा बहुमान आहे,’ असे ट्रम्प यांनी नमूद केले. जहाजावर असलेल्या चार नार्को-दहशतवाद्यांपैकी दोन मारले गेले. जर हे अमली पदार्थ अमेरिकेत पोहोचले असते, तर 25,000 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असता, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
या कारवाईत अमेरिकेच्या कोणत्याही सैनिकाला दुखापत झाली नाही. माझ्या देखरेखीखाली अमेरिका अमली पदार्थांची तस्करी सहन करणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अल जझीराच्या वृत्तानुसार, ही कारवाई गुरुवारी झाली आणि बचावलेल्या दोघांना अमेरिकेच्या युद्धनौकेवर नेण्यात आले आहे. वॉशिंग्टनने ही मोहीम अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. परंतु, मृतांच्या तस्करीतील सहभागाचे ठोस पुरावे अद्याप सादर केलेले नाहीत.