

दुबई; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातीच्या बरकाह अणू ऊर्जा प्रकल्पाला रविवारी एका ड्रोनद्वारेे लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या आवारातील एका वीज जनरेटरला आग लागली. यामुळे इराण युद्धातील आधीच डळमळीत असलेली युद्धबंदी पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.
यूएईची राजधानी अबुधाबी येथील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे कोणताही किरणोत्सर्ग झालेला नाही आणि कोणीही जखमी झालेले नाही; मात्र संशयाची सुई थेट इराणकडे जात आहे. यूएईच्या अणू नियमन प्राधिकरणाने सांगितले की, या आगीमुळे प्रकल्पाच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व युनिटस् नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत, असे या संस्थेने एक्सवर लिहिले आहे. रविवारचा हा हल्ला म्हणजे चार रिअॅक्टर असलेल्या बरकाह प्रकल्पाला इराण युद्धात पहिल्यांदाच लक्ष्य करण्याची घटना आहे. हा प्रकल्प अबुधाबीच्या पश्चिमेकडील दुर्गम वाळवंटी भागात, सौदी अरेबियाच्या सीमेजवळ आहे.
यूएईच्या अधिकृत निवेदनात या हल्ल्यासाठी कोणत्याही पक्षाला थेट जबाबदार धरण्यात आलेले नाही. व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे. इराणच्या या अडवणुकीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. दुसरीकडे, युद्धबंदी निश्चित करण्यासाठीच्या वाटाघाटी पुढे सरकण्यात अपयश आल्याने अमेरिकेने याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या बंदरांवर आर्थिक व व्यापारी नाकेबंदी सुरूच ठेवली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शत्रुत्व किंवा युद्ध पुन्हा सुरू होऊ शकते, असे संकेत दिले आहेत, तर इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर न्यूज अँकर्स कलाशनिकोव्हसारख्या बंदुका हातात घेऊन सातत्याने कार्यक्रम सादर करत आहेत. त्याद्वारे जनतेला युद्धासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मानण्यात येत आहे.
बरकाह प्रकल्प यूएईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
20 अब्ज डॉलर्स खर्च करून उभारण्यात आलेला बरकाह अणू ऊर्जा प्रकल्प यूएईने दक्षिण कोरियाच्या मदतीने बांधला असून तो 2020 मध्ये कार्यान्वित झाला. अरेबियन द्वीपकल्पातील हा पहिला आणि एकमेव अणू ऊर्जा प्रकल्प आहे आणि तो सात अमिरातींचे संघराज्य असलेल्या यूएईच्या एकूण ऊर्जा गरजांपैकी एक चतुर्थांश (पाव हिस्सा) गरज पूर्ण करू शकतो. अरब जगतातील हा पहिला व्यावसायिक अणू ऊर्जा प्रकल्पदेखील आहे.