

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक शस्त्रांची चाचणी पुन्हा सुरू करण्याचा अनपेक्षित आदेश दिला. यामुळे महासत्तांमधील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. ‘शांततेचे पुरस्कर्ते’ म्हणून वारंवार स्वतःची प्रशंसा करणार्या ट्रम्प यांनी हा आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत दक्षिण कोरियातील शिखर परिषदेत सहभागी होण्यापूर्वी सोशल मीडियावर जारी केला.
ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत, विशेषतः त्यांना शस्त्रास्त्र प्रणालीची चाचणी करायची आहे की प्रत्यक्षात अणुबॉम्बचा स्फोट घडवून आणायचा आहे, हे स्पष्ट केले नाही. अमेरिकेने प्रत्यक्ष अणुचाचणी 1992 पासून केलेली नाही. रशियाने नुकतेच अणु-सक्षम, अणुशक्तीवर चालणार्या क्रूझ क्षेपणास्त्रांची आणि सी ड्रोन्सची चाचणी केल्याचे घोषित केल्यानंतर काही दिवसांनी ट्रम्प यांचा हा आदेश आला आहे.
ट्रम्प यांच्या या निर्देशामुळे इराणमध्ये खळबळ उडाली असून, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याला ‘प्रतिगामी आणि बेजबाबदार’ तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक म्हटले आहे. जपानमधील अणुबॉम्ब हल्ल्यातील पीडितांच्या ‘निहोन हिदांक्यो’ या गटाने अमेरिकेच्या दूतावासाला निषेध पत्र पाठवले आहे. या निर्देशामुळे अण्वस्त्रमुक्त शांततापूर्ण जगासाठी प्रयत्न करणार्या जगातील राष्ट्रांच्या प्रयत्नांना थेट विरोध होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स यांनी अमेरिकेच्या आण्विक शस्त्रागाराची कार्यक्षमता तपासण्यासाठी चाचणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु, ट्रम्प यांनी नेमकी कोणत्या प्रकारची चाचणी करण्याचे आदेश दिले, यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही.
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियाच्या लष्करी गतिविधींबद्दल ट्रम्प यांना योग्य माहिती मिळाली नसावी, अशी शंका व्यक्त केली. रशियाच्या अलीकडील शस्त्रास्त्र सरावांचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत अणुचाचणी असा लावता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ट्रम्प यांनी आधी चाचणी केल्यास रशियाही प्रत्यक्ष अणुबॉम्ब चाचणी करेल, असे संकेत त्यांनी दिले.
युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी अणुचाचणीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे. चीनने अमेरिकेला जागतिक अणुचाचणी बंदीचे ईमानदारीने पालन करण्याचे आवाहन केले आहे.
1) अमेरिकेने 1992 नंतर अण्वस्त्रांची चाचणी केलेली नाही.
2) ट्रम्प यांनी समान आधारावर चाचणी सुरू करण्याचा आदेश दिला.
3) इराण आणि जपानमधील अणुबॉम्ब पीडितांच्या गटाकडून निषेध.
4) ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी हा आदेश दिला.