

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. डेल्सी यांनी व्हेनेझुएलासाठी अमेरिकेला योग्य वाटणारी गोष्ट केली नाही, तर त्यांची अवस्था मादुरोंपेक्षाही वाईट होऊ शकते. ट्रम्प यांनी हे वक्तव्य ‘द अटलांटिक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. यापूर्वी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेचे ऐकले, तर व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन सैन्य तैनात करण्याची गरज भासणार नाही.
दरम्यान, रॉड्रिग्ज यांनी मादुरोंना सत्तेवरून हटवल्याबद्दल टीका केली आहे. तसेच, अमेरिकेने मादुरोंना परत पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचीही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेण्याच्या कायदेशीरतेवर चर्चा होणार आहे. व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेला सहकार्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, व्हेनेझुएला अमेरिकेसोबत विकास आणि शांततेसाठी सहकार्याचा अजेंडा तयार करू इच्छितो.