Israel vs Donald Trump : ट्रम्प यांचा करार बंधनकारक नाही, इस्रायलची कठोर भूमिका; लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच

Israel vs Donald Trump
Published on
Updated on

तेल अविव : अमेरिका आणि इराण दरम्यान होत असलेल्या नव्या करारातील तरतुदी, विशेषतः लेबनॉनशी संबंधित अटी आपल्याला बंधनकारक नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. कराराचा मसुदा जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्वीर यांनी, या करारामुळे इस्रायलच्या लष्करी किंवा राजनैतिक निर्णयांवर मर्यादा येतील, हा विचार स्पष्टपणे फेटाळून लावला असून देशाच्या परराष्ट्र धोरणातील सार्वभौम स्वायत्ततेचा पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांचा करार आम्हाला बंधनकारक नाही. इस्रायल अमेरिकेच्या अधीन नाही. आम्ही एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहोत! आमचे कर्तव्य इस्रायलचे नागरिक, आयडीएफचे सैनिक आणि ज्यू जनतेप्रती आहे. हजारो वर्षांच्या वनवासात छळलेल्या आणि मारल्या गेलेल्या ज्यूंचा इतिहास आपल्याला आठवण करून देतो की, इस्रायलच्या भूमीवर ज्यूंना सुरक्षा प्रदान करणे हे आपले ऐतिहासिक कर्तव्य आहे, असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.

त्यांनी पुढे लिहिले, जेव्हा जेव्हा आपण इस्रायलच्या सुरक्षेचा बळी देऊन आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकलो, तेव्हा तेव्हा आपल्याला व्याजासह रक्ताची किंमत मोजावी लागली आहे. ओस्लो करारात हेच घडले, २००६ च्या लेबनॉन करारात हेच घडले आणि गाझातील प्रत्येकवेळच्या संयमाच्या काळातही हेच घडले. त्याचा स्फोट शेवटी आपल्या तोंडावर झाला. आम्ही हे स्पष्ट करतो, आमचे अमेरिकेवर प्रेम आहे आणि आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे ऋणी आहोत. तरीही इस्रायल हे काही ‘बनाना रिपब्लिक’ (कमकुवत राष्ट्र) नाही. मी पंतप्रधानांना या गोष्टी सतत सांगत असतो आणि प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक वळणावर बंद दारांआड या गोष्टींचा पुनरुच्चार करतो.

इस्रायली मंत्र्यांनी अत्यंत कडक भूमिका घेत स्पष्ट केले की, लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने डागलेल्या कोणत्याही ड्रोन किंवा क्षेपणास्त्राला इस्रायलच्या हल्ल्यानेच चोख उत्तर दिले जाईल.

ऐतिहासिक क्षणांमध्ये ऐतिहासिक निर्णय घ्यावे लागतात. माझी भूमिका स्पष्ट आहे. आमची सुरक्षा सुनिश्चित न करणाऱ्या या करारात आम्ही भागीदार नाही आणि तो आम्हाला कोणत्याही प्रकारे बांधील नाही. हिजबुल्लाहचे पूर्ण उच्चाटन करण्यापेक्षा कमी कशावरही आपण तडजोड करता कामा नये; आपल्या सैनिकांनी ज्या भूभागावर ताबा मिळवला आहे आणि जिथून दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत, तिथून आपण मागे हटता कामा नये. हजारो दहशतवादी उत्तरेकडील वस्त्यांच्या कुंपणावर येऊन बसतील अशा परिस्थितीत आपण पुन्हा जाता कामा नये आणि इस्रायलच्या दिशेने होणाऱ्या गोळीबारासमोर आपण एक क्षणही शांत बसता कामा नये. आपण हे स्पष्ट केले पाहिजे, लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने डागलेल्या प्रत्येक ड्रोन, यूएव्ही किंवा क्षेपणास्त्राच्या बदल्यात ‘दहिया’वर इस्रायली हल्ला होईल. काही महिन्यांपूर्वी हाच आमचा धाक (प्रतिरोध) होता आणि तो आपण कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वांना हे स्पष्ट केले पाहिजे, इस्रायलचे लोक ३,००० वर्षांचा इतिहास असलेले अमर लोक आहेत, जे प्रदीर्घ प्रवासाला घाबरत नाहीत. आमचा विश्वाचा निर्माता (ईश्वर) याच्यावर विश्वास आहे. आम्ही एक बलवान आणि अभिमानी लोक आहोत, जे आपल्या मातृभूमीत ताठ मानेने परतले आहेत आणि शत्रूंसमोर मान झुकवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ज्यूंनी मार खायचा आणि शांत राहायचा तो काळ आता संपला आहे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news