Donald Trump : नाभिकाचा नातू, अभिनेता ते नेता; अमेरिकेचा विजेता!

भावाच्या मृत्यूनंतर आयुष्यभर पाळली दारू न पिण्याची शपथ
Donald Trump Politics Entry
डोनाल्ड ट्रम्प file photo
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प हे एक करारी, धाडसी आणि म्हणूनच वादळी असे व्यक्तिमत्त्व. आपल्याकडे त्यांना लोक ‘तात्या’ही म्हणतात... जर्मनीतून अमेरिकेत पळून आलेल्या ट्रम्प यांच्या आजोबांनी इथे केशकर्तनालय चालवले. ट्रम्प यांच्या वडिलांनी बांधकाम व्यवसायात प्रतिष्ठा कमावली. ट्रम्प यांनी व्यवसायाची ही परंपरा आणखी उज्ज्वल तर केलीच; पण आपल्या आगळ्या डायलॉग डिलेव्हरीच्या बळावर उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही नाव कमावले. अत्यंत उशिरा ते राजकारणात आले आणि झाले ते थेट राष्ट्राध्यक्ष! आता एका अवकाशानंतर हा त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ असेल.

परंपरा : ट्रम्प यांचे आजोबा फ्रेडरिक जर्मनीचे रहिवासी होते. जर्मनीतील सक्तीच्या लष्करभरतीमुळे ते 16 वर्षांचे असताना अमेरिकेला पळाले. कटिंग सलून सुरू केले. नंतर हॉटेल, दारूच्या व्यवसायात हात आजमावला. पैसे जमले तसे अलास्कात खाणी घेतल्या. या खाणींतून ढिगाने सोने निघाले. फ्रेडरिक गर्भश्रीमंत झाले. फ्रेड ट्रम्प हे त्यांचे दोन नंबरचे चिरंजीव. फ्रेड यांनी बांधकाम व्यवसायात नाव व प्रतिष्ठा कमावली. ‘एलिझाबेथ ट्रम्प अँड सन्स’ ही रिअल इस्टेट कंपनी नावारूपाला आली. स्वस्तात घरे बनवून ते भाड्यानेही देऊ लागले. फ्रेड यांच्या पोटी न्यूयॉर्कमध्ये 14 जून 1946 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला.

शिक्षण : चांदीचा चमचा घेऊनच ट्रम्प जन्माला आले होते. सातवीपर्यंत ते शिकले. नंतर लष्करी शाळेत भरती झाले. येथे उत्तीर्ण झाल्यानंतर 1964 मध्ये 2 वर्षे ते फोर्डहम विद्यापीठात शिकले. नंतर पेन्सिलव्हेनिया विद्यापीठात. 1968 मध्ये अर्थशास्त्राची पदवी मिळवली. मोठा भाऊ फ्रॅड वयाच्या 43 व्या वर्षी दारूमुळे मरण पावल्याने आयुष्यभर दारू न पिण्याची व सिगरेट न ओढण्याची शपथ ट्रम्प यांनी घेतली आणि पाळली.

व्यवसाय : ट्रम्प यांनी वडिलोपार्जित कंपनीचे नामांतर ट्रम्प ऑर्गनायझेशन असे केले. 25 वर्षांचे असताना ते या कंपनीचे अध्यक्ष बनले. 1970 आणि1980 च्या दशकात एक महत्त्वाकांक्षी रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून जगभरात त्यांचे नाव झालेले होते.

विवाह : झेकोस्लोव्हाकियाच्या एक मॉडेल इव्हाना यांच्याशी ट्रम्प यांचे 1977 मध्ये लग्न झाले. त्यांना डोनाल्ड ज्युनिअर, एरिक ही मुले आणि इवांका ही मुलगी झाली. लग्नानंतर 8 वर्षांनी ट्रम्प आणि इव्हाना यांचा घटस्फोट झाला. ट्रम्प यांनी मग मार्ला मेपल्सशी लग्न केले. हिच्यापासून त्यांना टिफनी ही मुलगी आहे. पुढे 1997 मध्ये मार्लाशीही त्यांचा घटस्फोट झाला.

ट्रम्प यांच्या आयुष्यात 1998 मध्ये मग मेलानिया नॉस आल्या. 22 जानेवारी 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. मेलानियापासून बॅरन हा मुलगा त्यांना झाला.

प्रसिद्धी-राजकारण : डोनाल्ड ट्रम्प यांनी 1996 मध्ये मिस युनिव्हर्स, मिस यूएसए आणि मिस टीन यूएसए आयोजनाची खरेदी केली. ट्रम्प जगभर प्रसिद्ध झाले. नंतर त्यांनी ते विकूनही टाकले, हा भाग अलाहिदा. 2004 मध्ये ‘द अप्रेन्टिस’ या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोचे संचालन ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांना या शोमुळे घराघरांत ओळख मिळाली. अनेक चित्रपटांतून, मालिकांतूनही त्यांनी अभिनय केला. अधिकृतपणे ट्रम्प 2015 मध्ये अमेरिकेच्या राजकारणात पडले. 2017 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. 2020 मध्ये बायडेन यांनी त्यांना मात दिली. 2024 मध्ये बायडेन यांच्या पक्षाच्या उमेदवार कमला यांना मात देऊन ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news