

Donald Trump अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील महिन्यात 80 वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यापुर्वी व्हाईट हाऊसतर्फे त्यांची फिटनेस चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हृदयाचे वय हे त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा 14 वर्षांनी तरुण असल्याचे म्हटले आहे. म्हणजे ट्रम्प यांचे वय 80 असुन त्यांचे हृदय मात्र 65 वयाच्या व्यक्तिसारखे काम करते.
हृदय 14 वर्षांनी तरुण
डॉक्टरांच्या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या हृदयाचे ठोके विश्रांतीच्या वेळी प्रति मिनिट ७३ एवढे स्थिर आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या हृदयाचे वय त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा तब्बल १४ वर्षे तरुण असल्याचे समोर आले आहे.
ट्रम्प राष्ट्राध्यक्षांची कार्ये पार पाडण्यास सक्षम
ट्रम्प यांचा वार्षिक वैद्यकीय तपासणीचा (Annual Medical Exam) अधिकृत अहवाल व्हाईट हाऊसने जाहीर केला आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांची दरवर्षी फिटनेस चाचणी केली जाते. ट्रम्प यांचे डॉक्टर नेव्ही कॅप्टन शॉन बार्बाबेला यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ट्रम्प हे 'उत्कृष्ट प्रकृतीत' आहेत. त्यांचे हृदय, फुफ्फुसे, मज्जासंस्था आणि एकंदरीत शारीरिक कार्य अत्यंत मजबूत आहे.राष्ट्रप्रमुख' म्हणून आपली सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. गेल्या मंगळवारी ट्रम्प यांनी 'वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटर' येथे जाऊन ही तपासणी केली होती.
ट्रम्प यांचे वजन मात्र वाढले
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वजनात मात्र गेल्यावर्षीपेक्षा वाढ झाली आहे. 6 फूट 3 इंच उंची असलेल्या ट्रम्प यांचे वजन सध्या २३८ पाउंड (सुमारे १०८ किलो) आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या तपासणीच्या तुलनेत त्यांच्या वजनात १४ पाउंड (६.३ किलो) वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांचे वजन 102 किलो होते. या वाढत्या वजनामुळे डॉक्टर बार्बाबेला यांनी राष्ट्राध्यक्षांना योग्य आहार घेण्याचा, शारीरिक हालचाली वाढवण्याचा आणि वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांचे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना औषधे सुरू आहेत.
मानसिक दृष्ट्या पूर्णपणे सक्षम
अमेरिकेच्या इतिहासात सर्वात जास्त वयात राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे ट्रम्प हे मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहेत. मानसिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या Montreal Cognitive Assessment या चाचणीत ट्रम्प यांनी ३० पैकी ३० गुण मिळवले असून त्यांची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता 'अतिशय उत्तम आहे. असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या वर्षी ट्रम्प यांच्या हातावरील निळे डाग आणि पायाला आलेली सूज यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर बरीच चिंता आणि उलटसुलट चर्चा व्यक्त केली जात होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ट्रम्प यांना 'क्रॉनिक वेनस इन्सफिशियन्सी' नावाचा पायाच्या नसांचा आजार असल्याचे समोर आले होते. यामध्ये पायाच्या नसा हृदयाकडे रक्त योग्य प्रकारे पंप करू शकत नाहीत आणि त्यामुळे पायाच्या खालच्या भागात रक्त साठून सूज येते.
या अहवालानुसार ट्रम्प हे एस्पिरिनसोबतच कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणारी इतर दोन औषधे घेत आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या वयानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आरोग्य चाचण्या आणि लसीकरण वेळेवर पूर्ण केले आहे.