
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना मात दिली आहे. अमेरिकेचा न्युक्लिअर फुटबॉल आता विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आगामी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे येईल, हे आता निश्चित झाले आहे.
सर्व राज्यांचे इलेक्टर्स आता ठरतीलच. हे इलेक्टर्स मिळून इलेक्टोरल कॉलेज तयार होईल आणि इलेक्टोरल कॉलेज राष्ट्राध्यक्ष कोण ते ठरवेल. देशाच्या सर्व राज्यांतील इलेक्टर्स, इलेक्टोरल कॉलेजसाठी आपापली मते पाठवतील, तत्पूर्वी ते परस्परांना भेटतील. मते पाठवण्यापूर्वी किमान 6 दिवसआधी ही बैठक इलेक्टर्सना आपापल्या राज्यांत पार पाडावी लागेल.
शपथविधी सोहळ्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना एक ब्रीफकेस सोपवतील. या ब्रीफकेसलाच न्युक्लिअर फुटबॉल म्हणतात. काळ्या रंगाची हीब्रीफकेस अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अणुबॉम्बवर नियंत्रणाची शक्ती प्रदान करते. या ब्रीफकेसमध्ये न्युक्लिअर युद्धाचा आराखडा असतो. त्यासह ही ब्रीफकेस अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना कोणत्याही परिस्थितीत न्युक्लिअर बॉम्ब टाकण्याचा अधिकार प्रदान करते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिथे जातील तिथे एक लष्करी अधिकारी त्यांच्यासमवेत ही ब्रीफकेस घेऊनच सोबत असतो. कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष एखाद्या ठिकाणावर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेऊ शकतो.
10 डिसेंबर
नियमानुसार इलेक्टर्सकडून निवडीची ही प्रक्रिया डिसेंबरपूर्वी बुधवारनंतर येणार्या मंगळवारी (यावेळी 10 डिसेंबर) केली जाते. इलेक्टर्स आपापल्या मतांचे प्रमाणपत्र स्वाक्षरीनिशी वॉशिंग्टन डीसीला पाठवतील.
6 जानेवारी
अमेरिकन संसद इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी करेल. जो उमेदवार 538 पैकी 270 मतांचा आकडा पार करेल, त्याचे नाव राष्ट्राध्यक्ष म्हणून जाहीर होईल.
20 जानेवारी
नवे राष्ट्राध्यक्ष शपथग्रहण करतील. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नव्या राष्ट्राध्यक्षांना सत्तेची सूत्रे सोपवतील.
1. मावळत्या राष्ट्राध्यक्षाने नवोदित राष्ट्राध्यक्षाला खुर्ची सोपविण्याची अमेरिकेत परंपरा आहे; पण गत निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मात देऊन जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले होते, तेव्हा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परंपरेला फाटा दिला होता.
2. बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान ट्रम्प सुट्टीवर निघून गेले होते. आत जो बायडेनही तसेच करतात, की शांततापूर्ण सत्तांतराचे प्रतीक असलेला हा विधी पार पाडतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.