Pakistan Gas Crisis | पाकिस्‍तानात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल सात हजारांना!

इराणकडून पुरवठा बंद; शेकडो ट्रक सीमेवर अडकल्‍याने व्यापारही ठप्प
Pakistan Gas Crisis |
Pakistan Gas Crisis | पाकिस्‍तानात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल सात हजारांना!
Published on: 
Updated on: 

इस्लामाबाद; वृत्तसंस्‍था : जगभरात कटोरा घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानात आर्थिक मंदी आणि महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी हे संकट थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले असून, पाकिस्‍तानच्‍या अनेक प्रांतांत घरगुती गॅसचे (एलपीजी) १२ किलो वजनाचे सिलिंडर तब्‍बल सात हजार रुपयांना विकले जात आहे. म्हणजेच भारतातील विनाअनुदानीत सिलिंडरच्या तुलनेत पाकिस्तानात सातपट महागाई आहे.

शेजारी राष्‍ट्र असलेल्‍या इराणने १७ ऑक्टोबरपासून पाकिस्तानचा गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. इराणची सीमा बंद असल्यामुळे तेथे गॅस सिलिंडरने भरलेले शेकडो ट्रक अडकून पडले आहेत.

सिलिंडरचे दर दुपटीहून अधिक

इराणकडून गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे पाकिस्तानात १२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ४५०० पाकिस्तानी रुपयांना मिळणार्‍या सिलिंडरचा दर आता थेट ७ हजार ते ८२५० रुपयांवर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या ऑईल अँड गॅस रेग्युलेटरी ॲथॉरिटीने (ओजीआरए) ११.८ किलोच्या सिलिंडरची सरकारी किंमत ३,२९६ रुपये ठरवली असताना सरकारी दाव्यांची धूळधाण उडवत बाजारात हेच सिलिंडर दुप्पट ते तिप्पट दराने विकला जात आहे, हे विशेष. बलुचिस्तानात या सिलिंडरचा दर ७ हजार, लाहोरमध्ये ७५०० तर स्कर्दूमध्ये ८२५० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे.

ओमान-इराककडूनही धक्का

पाकिस्तानात सुमारे ७० टक्के एलपीजी परदेशातून आयात केले जाते. यातील ५० टक्के हिस्सा इराणचा आहे. आता १७ ऑक्टोबरपासून इराण व पाकिस्तान दरम्यानच्या दोन महत्त्वाच्या सीमा चौक्या बंद आहेत. सुरक्षा व तस्करी रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पाकिस्तान सांगत असले तरी इराणने यामागे तांत्रिक कारणे सांगितली आहेत. पाकिस्तानला इराक व ओमानकडूनही गॅस मिळतो. परंतु होर्मुझ खाडीत इराणशी संबंधित तणाव व युद्धजन्‍य परिस्थितीमुळे तिकडून होणारी आयातही प्रभावित झाली आहे.

अन्य वस्तूंचे ट्रकही अडकले

इराणची सीमा बंद असल्याने पाकिस्‍तानातील व्यापारही ठप्प झाला आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंना एलपीजी टँकरसह शेकडो ट्रक अडकले आहेत. इराणला पाठवले जाणारे बटाटे, केळी व तांदळाने भरलेले एक हजारहून अधिक पाकिस्तानी कंटेनरही सीमेवरच अडकून पडले आहेत.

सरकारची पोकळ आश्वासने

वाढत्या किमतींबाबत पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी दावा केला की, सरकार स्वतः एलपीजी आयात करून बाजारात आणेल आणि पुढील २-३ दिवसांत परिस्थिती सुधारेल. गॅसची किंमत ४०० ते ४२५ रुपये प्रति किलो असली पाहिजे आणि नफेखोरांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तथापि, प्रत्‍यक्षात बाजारभाव आणि स्थानिक किमतींमधील फरकामुळे सुमारे ३० अब्ज पाकिस्तानी रुपयांचा फेरफार होत असल्‍याचे वस्‍तुस्‍थिती सांगते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news