पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध आणि जैन समाजावरील हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाही टार्गेट केले जात आहे. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यासह इस्कॉनशी संबंधित चार पुजार्यांनाही बांगलादेश सरकारने अटक केली आहे. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आज ( दि. १) जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले.
बांगलादेशच्या मुद्द्यावर इस्कॉनच्या प्रशासकीय समितीचे आयुक्त गौरांग दास म्हणाले, 'आम्ही दर रविवारी कीर्तन आयोजित करतो. आज कीर्तनचे आयोजन बांगलादेशातील सर्व भाविक आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी केले गेले. इस्कॉन आणि इस्कॉनचे प्रशासकीय मंडळ एकमेकांच्या संपर्कात आहेत. बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त देखील सर्वांच्या संपर्कात आहेत आणि परिस्थिती सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, 'बांगलादेशात आतापर्यंत 4 इस्कॉन पुजार्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी दोघे चिन्मय दास प्रभू यांना औषध देण्यासाठी गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. चिन्मय दासच्या सचिवालाही अटक करण्यात आली आहे. इस्कॉनची १५० देशांमध्ये ८५० मोठी मंदिरे आहेत, हजारांहून अधिक केंद्रे आहेत. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणारे इस्कॉनचे करोडो भक्त आहेत, असेही त्यांनी सांगितले.
26 नोव्हेंबर रोजी बांगलादेशच्या सनातनी जागरण जोत संघटनेचे प्रवक्ते आणि पुंडरिक धामचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती, परंतु बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने त्यास नकार दिला आहे.