US Election Results | अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत ‘डेमोक्रॅटिक’ची मुसंडी; ट्रम्प यांना दणका

US Election Results |
टेक्सास : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत डेमाेक्रॅटिक पक्षाला मोठे यश मिळाले. या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा करताना समर्थक.
Published on: 
Updated on: 

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत मतदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का देत रिपब्लिकन पक्षालाही मोठा दणका दिला आहे. १९७४ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाविरोधात मतदान झाले असून, डेमोक्रॅटिक पक्षाने काँग्रेसच्या प्रतिनिधिगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळविले आहे. गेल्या अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या राज्यांमध्येही डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

टेक्सासमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटच्या जागेसह गव्हर्नरपदाची निवडणूकही जिंकली. १९९४ नंतर प्रथमच या राज्यात पक्षाला राज्यव्यापी निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये सिनेटची जागा आणि जॉर्जियामध्ये गव्हर्नरपद १९९८ नंतर प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाने मिळविले. कॅन्ससने तर १९३२ नंतर प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार सिनेटवर पाठवला आहे.

प्रतिनिधिगृहाच्या निवडणुकीतही डेमोक्रॅटिक पक्षाने मोठी आघाडी घेतली. केंटकीमधील ज्या मतदारसंघात २०२४ मध्ये ट्रम्प यांना १५ टक्क्यांची आघाडी मिळाली होती, तेथेही डेमोक्रॅटिक उमेदवार विजयी झाले.

ट्रम्प यांचा ‘व्हेटो’ कॅपचा फोटो

पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) शैलीतील लाल रंगाची ‘व्हेटो’ लिहिलेली टोपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ट्रम्प म्हणाले होते की, रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण गेले, तर विरोधकांनी मांडलेली विधेयके मंजूर होऊ देणार नाही. असे झाले तर मी मिस्टर व्हेटो बनेन. राष्ट्राध्यक्षांकडे असलेला व्हेटोचा अधिकार हा सर्वांत प्रभावी अधिकारांपैकी एक आहे, असेही ट्रम्प म्हणाले होते.

देश जोडणाऱ्यांना कौल : ओबामा

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, ‘अमेरिकन जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांना फूट पाडणारे नव्हे, तर लोकांना एकत्र आणणारे राजकारण हवे आहे,’ अशा शब्दांत ‘एक्स’ पोस्टमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवारांचे अभिनंदन केले. अधिकारी आणि स्वयंसेवकांचे आभार. ट्रम्प प्रशासनाची दोन वर्षे शिल्लक असून, या काळात डेमोक्रॅट्सनी उपलब्ध अधिकारांचा वापर करून आवश्यक बदल घडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.