Brain Fungal Infection : मेंदूला संसर्ग करणारा प्राणघातक बुरशीजन्य आजार वाढतोय, शास्त्रज्ञ उत्तरांच्या शोधात

संसर्गाचा उगमही अस्‍पष्‍ट
Brain Fungal Infection : मेंदूला संसर्ग करणारा प्राणघातक बुरशीजन्य आजार वाढतोय, शास्त्रज्ञ उत्तरांच्या शोधात
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्‍टन : मानवी मेंदूवर हल्ला करणाऱ्या दुर्मीळ; पण प्राणघातक बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. मागील दशकात ‘क्लॅडोफिओलोफोरा बँटियाना’ या बुरशीशी संबंधित प्रकरणांत लक्षणीय वाढ झाल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वॉशिंग्टन विद्यापीठ व ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) मधील शास्त्रज्ञांनी पुष्टी झालेल्या प्रकरणांच्या अहवालांचा अभ्यास केल्‍यावर २०२३ पासून या संख्येत विशेषतः मोठी वाढ झाल्याचे आढळले. हा संसर्ग माणसाला कसा होतो हे अद्याप अस्पष्ट आहे, ज्यामुळे याचे प्रमाण का वाढत आहे, हे निश्चित करणे कठीण झाले आहे.

या वाढीची नेमकी कारणे अद्याप अज्ञात आहेत, असे ‘सीडीसी’च्या ‘मॉर्बिडिटी अँड मॉर्टेलिटी वीकली रिपोर्ट’मध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित शोधनिबंधातील लेखात म्‍हटले आहे. बुरशीजन्य संसर्ग दुर्मीळ असतात आणि मेंदूवर हल्ला करणारे संसर्ग तर त्याहूनही दुर्मीळ असतात. ते मेंदूपर्यंत पोहोचले तर शरीरातील इतर आजाराचे दुष्परिणाम असतात. ज्यांची प्रतिकारकशक्ती कमकुवत आहे, ते अशा संसर्गांना अधिक बळी पडतात.

सी. बँटियानाचे गूढ

हे नियम उधळून लावणार्‍या सी. बँटियानाचे मुख्य लक्ष मेंदू असते. तेथे ती बुरशीने भरलेल्या पुवाच्या गाठी तयार करते. अनेक वर्षांपासून ‘सी. बँटियाना’ बुरशीजन्य संसर्गाची पुष्टी झालेली प्रकरणे नोंदवली जात असलेल्‍या वॉशिंग्टन विद्यापीठातील विशेष वैद्यकीय संदर्भ प्रयोगशाळेतील संशोधकांनी डेटाचे विश्लेषण केले. संशोधन पथकाने सर्व संशयित बुरशीजन्य मेंदूच्या संसर्गासाठी पाठवलेल्या नमुन्यांच्या एकूण संख्येशी पॉझिटिव्ह नमुन्यांच्या प्रमाणाची तुलना केली. यावरून या प्रकरणांचे प्रमाण उघड झाले.

अभ्यासानुसार असे दिसते की, २०१७ मध्ये सुरू झालेली ही वाढ २०२१ मध्ये स्पष्ट होऊ लागली. २०१७ ते २०२३ दरम्यान दर एक हजार नमुन्यांमागे ‘सी. बँटियाना’ची सरासरी ८.४ प्रकरणे होती. २०२३ ते २०२५ दरम्यान ही संख्या चाैपट वाढली.

ही बुरशी सर्वप्रथम १९११ मध्ये मेंदूतील गाठीत (ब्रेन ॲब्ससे) आढळली होती. परंतु, आजवर तिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ती नैसर्गिकरीत्या कुठे आढळते, हेही शास्त्रज्ञांना ठाऊक नाही. संसर्गाचा मार्गही समजलेला नाही. परंतु, मेंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वी ती त्वचा किंवा श्वासावाटे शरीरात प्रवेश करते, असे मानले जाते. निरोगी लोकही याला का बळी पडतात याचे कारणही अद्याप अज्ञात आहे. तथापि, तज्ज्ञांना संख्येतील या वाढीबद्दल सर्वात जास्त चिंता वाटत आहे आणि रुग्णांच्या संख्येचे स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी पद्धतशीर डेटा संकलनावर त्यांनी भर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news