

नेपाळने सप्टेंबरमध्ये 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती; पण तीव्र विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. फ्रान्स अल्पवयीन मुलांसाठी नियंत्रणे आणत असताना, इतर अनेक देशांमध्ये सोशल मीडियावर कठोर बंदी लागू आहे. जगभरात असे अनेक देश आहेत, जिथे सोशल मीडियावर पूर्ण किंवा अंशतः बंदी आहे.
चीनमध्ये ’ग्रेट फायरवॉल’ अंतर्गत सोशल मीडियावर बंदी आहे. त्याऐवजी, लोक वीचॅट, वेइबो, डोयिन आणि क्यूक्यू यांसारखे सरकारद्वारे नियंत्रित अॅप्स वापरतात. मात्र, हाँगकाँग आणि मकाऊ याला अपवाद आहेत.
उत्तर कोरियामध्ये सामान्य नागरिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप, यूट्यूब किंवा ट्विटर वापरता येत नाही. सामान्य नागरिक ’क्वांगम्योंग’ नावाच्या देशांतर्गत इंट्रानेटपुरते मर्यादित आहेत. परदेशी मीडिया पाहणे किंवा पसरवणे हा येथे गुन्हा मानला जातो.
रशियाने 2022 मध्ये फेसबुक, ट्विटर आणि इतर अनेक मोठ्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकार कठोर सेन्सॉरशिप आणि पाळत ठेवते. सरकारविरोधी मानल्या जाणार्या वेबसाईटस् नियमितपणे ब्लॉक केल्या जातात.
इराणमध्ये फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर बर्याच काळापासून बंदी आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मजकूर रोखण्यासाठी आणि देशांतर्गत अॅप्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ऑनलाईन हालचालींवर सेन्सॉरशिप लावते.
तुर्कमेनिस्तानने जवळपास सर्वच परदेशी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. येथे लोक फेसबुक, ट्विटर, यूट्यूब किंवा इन्स्टाग्राम वापरू शकत नाहीत. इंटरनेटवर कठोर नियंत्रण असून, केवळ सरकारने मान्यता दिलेल्या साईट्सना परवानगी आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर म्यानमारने फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर बंदी घातली. विरोधी आवाज दाबण्यासाठी आणि बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्करी सरकारने हे प्लॅटफॉर्म ब्लॉक केले.