US Iran agreement | अमेरिका-इराण कराराबाबत संभ्रम

वॉशिंग्टनचा प्रगतीचा दावा तर तेहरानकडून वृत्ताचे खंडन
US Iran agreement |
तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनीत अद्याप अनेक जहाजे अडकून पडली आहेत.
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य कराराबाबत गुरुवारी संमिश्र संकेत मिळाले आहेत. वॉशिंग्टनने चर्चेत सकारात्मक प्रगती झाल्याचा दावा केला असून, तेहरानने मात्र करार अंतिम टप्प्यात असल्याच्या वृत्ताला तूर्तास फेटाळले आहे.

अमेरिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये एक प्राथमिक सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत इराण अण्वस्त्रे तयार न करण्याचे मान्य करेल आणि समृद्ध युरेनियमचा साठा नष्ट करण्यावर चर्चा करेल. या बदल्यात अमेरिका इराणवरील निर्बंध शिथिल करेल, तेल निर्यातीला परवानगी देईल आणि त्याचे गोठवलेले पैसे परत करण्याबाबत विचार करेल. तसेच, इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करेल. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अंतिम निर्णयासाठी आणखी काही वेळ हवा आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॉन्स यांनी सांगितले की, ‘आम्ही अद्याप अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, पण कराराच्या खूप जवळ आहोत. युरेनियम समृद्धीकरणाच्या काही मुद्द्यांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत.’

इराणकडून कराराचे खंडन

दुसरीकडे, इराणच्या तस्नीम या वृत्तसंस्थेने हा करार अंतिम झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. इराणच्या वाटाघाटी पथकातील सूत्रांनी स्पष्ट केले की, मध्यस्थी करणार्‍या पाकिस्तानला अद्याप कोणत्याही अंतिम मसुद्याची माहिती देण्यात आलेली नाही. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत पाश्चात्य माध्यमांचे दावे विश्वसनीय मानले जाऊ शकत नाहीत.

अमेरिकेचा दावा : अमेरिका आणि इराण दरम्यान प्राथमिक सामंजस्य करार तयार असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अंतिम मंजुरीसाठी वेळ घेत आहेत.

इराणचा नकार : इराणने करार अंतिम झाल्याच्या वृत्ताचे खंडन करत पाश्चात्य माध्यमांचे दावे अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे.

युरेनियमचा वाद : समृद्ध युरेनियमचा साठा आणि त्याचे शुद्धीकरण या मुद्द्यांवरून दोन्ही देशांमध्ये अजूनही मुख्य पेच कायम आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा : इराणचे नौदल आणि वायुदल पूर्णपणे नष्ट झाले असून त्यांची 159 जहाजे समुद्राच्या तळाशी आहे.

पुन्हा हल्ला : अमेरिकेच्या हिताचा करार न झाल्यास इराणविरुद्ध पुन्हा लष्करी मोहीम सुरू करण्याचा ट्रम्प यांचा इशारा

इराणच्या तेल व्यापारावर पुन्हा निर्बंध

अमेरिकेने गुरुवारी इराणच्या लष्करी तेल व्यापारावर नवीन आर्थिक निर्बंध लादले आहेत. विशेष म्हणजे, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात युद्धबंदी वाढवण्यासाठी आणि होर्मुझ समुद्रधुन मधून जहाजांच्या वाहतुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी प्राथमिक करार झाला असतानाच अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. इराणचे कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने जागतिक बाजारपेठेत नेणार्‍या एकूण 8 जहाजांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मार्शल आयलँडस्चा ध्वज असलेले तेलवाहू जहाज फ्लोरा, कोमोरोसचे ह्वेनकायो आणि पनामाच्या इल गॅप या प्रमुख जहाजांचा समावेश आहे.

होर्मुझबाबत प्राथमिक करार

रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धबंदीचा कालावधी वाढवण्याबाबत आणि हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू करण्याबाबत एक प्राथमिक करार झाला आहे. हा करार मंजूर झाल्यास 60 दिवसांसाठी युद्धबंदी वाढेल. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या संघर्षानंतर शांततेच्या दिशेने हे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.

अमेरिकेचे विमान पाडले

इराणच्या सशस्त्र दलांनी देशाच्या दक्षिण भागातून ठराविक लक्ष्यांच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्याची मोहीम राबवली, त्यात बुशेहरमध्ये अमेरिकेचे एक विमान पाडण्यात आल्याची माहिती फार्स या निमसरकारी वृत्तसंस्थेने दिली. या क्षेपणास्त्रांचे नेमके ठिकाण स्पष्ट झालेले नाही, असेही स्पष्ट करण्यात?आले. दरम्यान, तस्नीम वृत्तसंस्थेने सांगितले की, समुद्रातून येणारे आवाज हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांना इशारा देण्यासाठी झालेल्या गोळीबारामुळे आले होते. यानंतर, इराणच्या सरकारी टीव्हीने मसूद तंगेस्तानी यांच्या हवाल्याने वृत्त दिले की, इराणच्या जाम भागात अमेरिकेचे एक विमान नष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news