

अंकारा; वृत्तसंस्था : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इराणमधील अनेक नागरिक सुरक्षिततेच्या शोधात देश सोडत आहेत. तुर्कियेच्या पूर्वेकडील वन प्रांतातील कापिकोय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत शेकडो लोकांनी सीमा ओलांडली असून, तिथे सतत ये-जा सुरू आहे. भीती, थकवा आणि अनिश्चितता घेऊन हे नागरिक दीर्घ प्रवासानंतर तुर्कियेच्या भूमीवर पोहोचत आहेत. हिमाच्छादित पर्वतरांगांनी वेढलेल्या या सीमारेषेवर अनेक कुटुंबे, एकटे प्रवासी आणि परदेशी कामगार दिसत आहेत. काही जण ट्रेन, कार किंवा बसने अनेक दिवसांचा प्रवास करून येथे पोहोचले. युद्धामुळे विमानसेवा बंद झाल्याने अनेकांनी जमिनीमार्गे देश सोडण्याचा मार्ग निवडला. काहींच्या शहरांवर बॉम्बहल्ले झाले, तर काहींनी कुटुंबीयांशी संपर्क तुटल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
कामगार आणि प्रवाशांची कठीण परिस्थिती
इजिप्तचा 46 वर्षीय कामगार मोहम्मद फौजी इराणमधील मार्बल आणि ग्रॅनाइट उद्योगात काम करत होता. मात्र युद्ध वाढल्याने अनेक कारखाने बंद झाले आणि काम थांबले. तुर्की भाषेचे ज्ञान नसताना, स्थानिक सिमकार्ड किंवा चलन नसतानाही तो सीमा ओलांडून तुर्कियेत पोहोचला. “परिस्थिती खूप कठीण आहे. काम बंद झाले आहे आणि शहरात राहणेही धोकादायक झाले आहे. त्यामुळे मी माझ्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला,” असे त्याने सांगितले. राजधानीतील भीतीमुळे पलायन तेहरानमधील 63 वर्षीय जलिलेह जबारी म्हणाल्या की, सततचे बॉम्बहल्ले आणि अनिश्चित वातावरणामुळे त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्या आता इस्तंबूलला जाणार आहेत, जिथे त्यांची मुलगी शिक्षण घेत आहे.
लेबनॉनमध्ये 24 तासांत 1 लाख लोकांचे स्थलांतर
बेरूत : लेबनॉनमध्ये इस्रायलच्या वाढत्या हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपली घरे सोडावी लागत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्त (यूएनएचसीआर) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केवळ 24 तासांत सुमारे 1 लाख लोक विस्थापित झाले आहेत.जिनिव्हामधील पत्रकार परिषदेत बेरुतमधून बोलताना यूएनएचसीआरच्या प्रतिनिधी कॅरोलिना लिंडहोम बिलिंग यांनी सांगितले की, लेबनॉन सरकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंद झालेल्या विस्थापितांची एकूण संख्या आता 6 लाख 67 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.