China weapon test news | ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चीनने साधली शस्त्रास्त्र चाचणीची संधी

अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन अहवालात दावा
China weapon test news
China weapon test news ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चीनने साधली शस्त्रास्त्र चाचणीची संधी
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चीनने पाकिस्तानकडून त्यांच्या नव्या शस्त्रांची, तसेच गुप्तचर यंत्रणांची क्षमता तपासली. या भारत-पाक संघर्षात चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी करण्याची संधी साधली, असा खळबळजनक दावा अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगाने (यूएससीसी) अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या 2025 च्या वार्षिक अहवालात केला आहे. या प्रदेशात चीनच्या वाढत्या लष्करी भूमिकेबद्दलही या अहवालात तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या संघर्षादरम्यान पाकिस्तानचे सैन्य चिनी शस्त्रांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. तो चिनी गुप्तचर यंत्रणेचा वापर करत होता. चार दिवस चाललेल्या या संघर्षात भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या हद्दीत लांबवर जाऊन गेल्या 50 वर्षांत कधीही न पाहिलेला हल्ला केला होता, असे अहवालात म्हटले आहे. 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या हा संघर्ष एकप्रकारचे ‘प्रॉक्सी वॉर’च होते. त्यामुळे चीनची भूमिका पाकिस्तानला भविष्यातही ‘प्रेरणा देणारी’ ठरू शकते, असे अहवालात नमूद केले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’आधी चीनची पाकिस्तानसोबतची वाढती संरक्षण भागीदारी अधोरेखित झाली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये, दोन्ही देशांनी दहशतवादविरोधी तीन आठवड्यांचे वॉरिअर सराव केले. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पीएलए नौदलाने पाकिस्तानच्या बहुराष्ट्रीय ‘अमान’ सरावात भाग घेतला. भारतीय सुरक्षा विश्लेषकांनी या सहभागांना पाकिस्तानमध्ये चीनच्या वाढत्या धोरणात्मक प्रभावाचे आणि भारताच्या सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचे म्हटल्याकडेही अहवालात लक्ष वेधले आहे.

‘यूएससीसी’च्या मते, संघर्षादरम्यान पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रे वापरली. चीनने भारतासोबतचा सीमा तणाव आणि त्याच्या विस्तारत्या संरक्षण उद्योग उद्दिष्टांशी संबंधित प्रणालींची चाचणी आणि प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर केला. 2019 ते 2023 दरम्यान पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीपैकी 82 टक्के चीनने पुरवठा केला.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जेमतेम एक महिन्यानंतर म्हणजे, जून 2025 मध्ये चीनने पाकिस्तानला एक मोठे नवीन संरक्षण पॅकेज देऊ केले. त्यामध्ये 40 जे-35 ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने, केजे-500 ही हवेतून पूर्व चेतावणी देणारी विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा समावेश आहे. त्याच महिन्यात, पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण बजेटमध्ये 20 टक्के वाढ जाहीर केली. त्यांच्या एकूण राष्ट्रीय खर्चात कपात करून ते 9 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवले, असेही ‘यूएससीसी’च्या अहवालात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news