

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनची डझनभर लढाऊ विमाने आणि जहाजे तैवानच्या सीमेजवळ (२४ नॉटिकल मैल क्षेत्र) घिरट्या घालत आहेत.
China Taiwan conflict
तैपेई: चीनने तैवानच्या भोवती मोठ्या प्रमाणावर 'लाईव्ह-फायर' (प्रत्यक्ष गोळीबार) लष्करी सराव सुरू केला असून, यामुळे तैवानच्या सामुद्रधुनीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. 'जस्टिस मिशन २०२५' (Justice Mission 2025) असे नाव देण्यात आलेल्या या सरावात चीनचे हजारो सैनिक, युद्धनौका, लढाऊ विमाने आणि तोफखाना विभाग सहभागी झाला आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
चीनच्या 'पीपल्स लिबरेशन आर्मी'ने (PLA) दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी सरावामध्ये जमीन आणि समुद्रातील लक्ष्यांवर हल्ले करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे तैवान सामुद्रधुनीच्या उत्तर आणि नैऋत्य भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तैवानमधील मुख्य बंदरांची नाकेबंदी करणे आणि या बेटाला पूर्णपणे वेढणे, हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे चीनच्या 'ईस्टर्न थिएटर कमांड'ने म्हटले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनची डझनभर लढाऊ विमाने आणि जहाजे तैवानच्या सीमेजवळ (२४ नॉटिकल मैल क्षेत्र) घिरट्या घालत आहेत. चीनच्या या कृतीचा तैवानने तीव्र शब्दांत निषेध केला असून याला 'चिथावणीखोर पाऊल' म्हटले आहे. या लष्करी सरावाचा मोठा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. मंगळवारी १ लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि सुमारे ६,००० देशांतर्गत प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, अमेरिकेने तैवानसाठी ११.१ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी शस्त्रास्त्रांची घोषणा केल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत चीनने हे पाऊल उचलले आहे. २०२२ नंतरचा हा चीनचा सहावा मोठा सराव आहे. विश्लेषकांच्या मते, अशा सरावांद्वारे चीन आपली तयारी वाढवत असून अमेरिका आणि मित्रराष्ट्रांना इशारा देत आहे.चीनच्या प्रवक्त्याने हा सराव म्हणजे "तैवानच्या स्वातंत्र्यवादी शक्तींना आणि बाहेरील हस्तक्षेपांना दिलेला गंभीर इशारा" असल्याचे म्हटले आहे.