

बीजिंग/शांघाय; वृत्तसंस्था : जपानमध्ये मोठा तडाखा दिल्यानंतर ‘डॉल्फिन’ वादळाने आता चीनच्या पूर्व किनारपट्टीकडे धडक दिली आहे. रविवारी रात्री उशिरा या वादळाने पूर्व चीनमधील किनारी भागात प्रवेश केला. त्यावेळी वाऱ्यांचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रतितास इतका होता. वादळामुळे चीनमधील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले असून, शांघाय शहराला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
शांघायमध्ये गेल्या १५० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे वृत्त आहे. चिनी प्रशासनाने १० लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. वादळाची तीव्रता काहीशी कमी होत असल्याने चीनच्या हवामान विभागाने इशाऱ्याची पातळी कमी केली आहे.
वादळामुळे शांघाय शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून, घरांमध्ये आणि दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला. दोन प्रमुख विमानतळांवर सोमवारी तब्बल ९४३ विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चेंगदू येथून आलेले विमान खराब हवामानामुळे शांघायमध्ये उतरू शकले नाही ते बीजिंगकडे वळवण्यात आले. स्थानिक रेल्वेसह सार्वजनिक वाहतुकीच्या अनेक सेवाही खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या. झेजियांगमध्ये ‘डॉल्फिन’च्या वाऱ्यामुळे एका ट्रकचा अपघात होऊन तो रस्त्यावर उलटला. वादळाचा धोका लक्षात घेऊन १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. किनारी भागांत नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत.
वादळाच्या प्रभावामुळे राजधानी बीजिंगमधील पाच जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘डॉल्फिन’ वादळ सध्या उत्तर-पश्चिम दिशेने १५ ते २० किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. वादळाची ढगांची प्रणाली सुमारे १३०० किलोमीटरपर्यंत पसरलेली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.