

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनने आपल्या वार्षिक संरक्षण बजेटमध्ये ( China defense budget) 7.2 टक्के वाढ जाहीर करत ते 245 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक केले आहे. भारतीय रुपयांमध्ये हे एकूण सुमारे ₹21.34 लाख कोटी रुपये इतका होते. हा मोठा निधी चीन आपल्या लष्करी क्षमता प्रबळ करण्यासाठी जमिनीवर, हवाई, समुद्री, अण्वस्त्र, अंतराळ आणि सायबर क्षेत्रात वेगाने गुंतवत आहे. इंडो-पॅसिफिक आणि जागतिक पातळीवर प्रभाव वाढवण्यासाठी तसेच संभाव्य विरोधकांना सामोरे जाण्यासाठी चीनचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, अण्वस्त्र क्षेत्रात चीन वेगाने वाढ करत असून, सध्या 600 हून अधिक कार्यरत अण्वस्त्र आहेत आणि 2035 पर्यंत हा आकडा 1,000 पार करेल, असा अंदाज आहे. पाकिस्तान आणि भारत सध्या सुमारे 160-170 अण्वस्त्रांसह समतोल राखत आहेत. तसेच, चीनकडे आता 370 हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्यांसह जगातील सर्वात मोठे नौदल आहे. अमेरिका तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत असली तरी चीन आपली सामुद्रिक ताकद प्रबळ करत आहे. चीनने पाकिस्तानच्या नौदलाच्या बळकटीसाठीही मदत केली असून, 'सी गार्डियन' या नौदल सरावांद्वारे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वाढत आहे. भारतासमोर उभ्या राहणाऱ्या या सामरिक आव्हानांवर मात करण्यासाठी संरक्षण बजेट वाढवणे व लष्करी आधुनिकीकरणाला गती देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भारताच्या 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, संरक्षण क्षेत्रासाठी एकूण 6.21 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या सुमारे 13 टक्के आहे. जी गेल्या वर्षाच्या तुलनेत किंचित वाढलेली आहे. चीनने जाहीर केलेले हे बजेट भारताच्या सरंक्षण बजेटपेक्षा तीन पटीपेक्षाही जास्त आहे. दोघांच्या बजेटमध्ये सुमारे 15 लाख कोटी रुपयांचा फरक आहे.