

Bondi Beach Shooter Sajid Akram Philippines: फिलीपीन्सच्या दवाओ शहरात हॉटेल फार स्वस्तात मिळतात. याच ठिकाणी ऑस्ट्रेलियातील बोंडी बीड हल्ल्यातील दहशतवादी एका हॉटेलमध्ये तब्बल २७ दिवस राहिले. त्यांनी हे हॉटेल २२ डॉलर पर नाईट या दरानं बुक केलं होतं. त्यांनी सुरूवातीला या हॉटेलचं बुकिंग एका आठवड्यासाठी केलं होतं. त्यानंतर त्यांनी ते वाढवत नेलं.
ज्या हॉटेलमध्ये साजिद अक्रम हा दहशतवादी थांबला होता. त्या हॉटेल रूममध्ये दोन छोटे छोटे बेड होते. यावर एक माणूस कसाबसा झोपू शकत होता. साजिद आणि नवीद अक्रम यांचे बेड जवळ जवळच होते. या हॉटेलमधील स्टाफने सांगितलं की ज्या दिवशी हे दोघे या हॉटेलमध्ये आले ज्या दिवशी त्यांनी हॉटेल रूम सोडली यादरम्यान या दोघांनी आम्ही कधी हे शहर सोडताना पाहिले नाही. आम्ही त्यांना रोज हॉटेलमधून येताना अन् जाताना पाहत होतो.
हे शहर फिलीपीन्सच्या दक्षिण भागात आहे. या शहरात असलेल्या हॉटेलमध्ये अक्रम अन् नवीद हे दोन बाप बेटे दहशतवादी २७ दिवस राहिले होते. याबाबतची माहिती ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र द सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये छापून आली आहे.
या हॉटेलचे नाव जीवी हॉटेल असे आहे. त्या हॉटेलमधील स्टाफ जेनेलिस सेसनने सांगिंतले की हे दोन बाप बेटे दहशतवादी गेल्या महिन्यात २७ दिवस दावाओ सिटी हॉल आणि पोलीस हेडक्वार्टच्या जवळच्या हॉटेलमध्ये एकच रूम शेअर करून राहत होते. या दोघांनी ३१५ नंबरची रूम बुक केली होती. यात दोन बेड होते. या दोघांनी तीनवेळा आपले बुकिंग वाढवले होते.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितलं की अक्रम अन् नवीद हे दोघेही दिवसभरात फक्त १ तासच रूमच्या बाहेर जात होते. सेसन यांनी सांगितलं की या दोघांचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नाही कारण या सीसीटीव्हीच्या रेकॉर्डिंगची क्षमता ही फक्त एका आठवड्याची होती. मात्र लष्करी अधिकारी तपास करण्यासाठी आले होते त्यांनी कॉम्प्युटरची हार्ड ड्राईव्ह नेली आहे.
नवीद अक्रम यांनी हॉटेलमध्ये बुकिंग करताना फिलीपीन्सचा फोन नंबर दिला होता. याचा अर्थ ते स्थानिक सीम कार्ड वापरत होते. हॉटेल कर्मचाऱ्याच्या मते दहशवादी अक्रम हॉटेल स्टाफ सोबत फारसं बोलत नव्हता. एवढंच काय त्यांना कोणी भेटायला देखील आल्याचं स्टाफला दिसून आलेलं नाही. या रूममध्ये फास्ट फूड चेन जॉलीबीचे रॅपिंग सापडले होते.
हॉटेल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांकडे भरपूर सामान आणि एक मोठी बॅगपॅक होती. ज्या ज्यावेळी या दोघा दहशतवाद्यांनी आपले हॉटेल बुकिंग वाढवले त्या त्यावेळी त्यांनी कॅशमध्ये पेमेंट केलं.
ऑस्ट्रेलियाचे न्यू साऊथ वेल्स पोलिसांना या दहशतवादी हल्ल्यानंतर अक्रमच्या गाडीत आणि घरातून इस्लामिक स्टेट्सचे झेंडे मिळाले होते. मात्र फिलीपीन्सच्या अधिकाऱ्यांनी अक्रमने त्यांच्या देशात राहताना कोणत्या इस्लामिक दहशवाद्यांसोबत ट्रेनिंग घेतल्याचं आढळून आले नसल्याचे सांगितले.
फिलीपीन्सचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एडुआर्डो एनो ने या वक्तव्यात सांगितलं की, फक्त भेटीवरून दहशवादी ट्रेनिंगचे आरोप सिद्ध करता येत नाहीत. त्यांचे पूर्ण ट्रेनिंग होऊ शकेल इतका त्यांचा फिलीपीन्समध्ये राहण्याचा कालावधीही नव्हता.
१४ डिसेंबर रोजी बोंडी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ निष्पाप लोकांचा जीव गेला. हा हल्ला ज्यू लोकांच्या हनुक्का उत्सवादरम्यान झाला होता. या हल्ल्यात दहशतवादी साजीद मारला गेला तर त्याचा मुलगा नवीद अक्रम हा गंभीररित्या जखमी झाला होता. नवीदला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.