

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवित हाणी झालेली नाही. फेकण्यात आलेले दोन बॉम्ब हे उत्तर इस्रायलच्या सीझरिया शहरात बागेत पडले होते. पोलिसांनी शनिवारी (दि.17) ही माहिती दिली. त्यावेळी नेतन्याहू किंवा त्यांचे कुटुंबीय घरामध्ये उपस्थित नव्हते. अशी माहिती वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने दिली आहे.
या घटनेचा निषेध व्यक्त करताना इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी रविवारी पहाटे ट्विटरवर एका पोस्टमध्ये सांगितले की, या घटनेने दुश्मनांनी त्याच्या सर्व हद्दी पार केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आता आवश्यक ते सर्व पावले उचलू असा इशारा देखील दिला आहे. कॅटझ यांनी सुरक्षा आणि न्यायिक संस्थांना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे
इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हर्झोग यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये या घटनेचा निषेध केला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. "पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात चिथावणीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत," असे सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी ट्विटरवर सांगितले. आज रात्री त्यांच्या घरावर फ्लॅश बॉम्ब गोळीबार करणे आणखी मर्यादा ओलांडत आहे.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सीझरिया येथील घराच्या दिशेने ड्रोन सोडण्यात आले होते, त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. उत्तरेत, इस्रायली सैन्य ऑक्टोबर 2023 पासून लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लासोबत युद्ध करत आहे. शनिवारच्या घटनेची जबाबदारी सध्यातरी कोणीही घेतलेली नाही. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले होते की इराणच्या प्रॉक्सी हिजबुल्लाहने सीझरिया शहरातील त्यांच्या घरावर ड्रोन हल्ला करून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इस्रायलकडे अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा असूनही ते ड्रोनपासून सुरक्षित नाही हे या घटनेने अधोरेखित केले.