

पुढारी ऑनलाईन डेस्क: अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत. अनेक नोकऱ्यांमध्ये महत्वाची कामगिरी AI पार पाडत आहे. एकंदरीत जगभरात AI मुळे अनेक नोकऱ्या धोक्यात आलेल्या असताना मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी AI च्या आक्रमणातही सुरक्षित राहतील अशा तीन नोकऱ्या सांगितल्या आहेत. जाणून घेऊया बिल गेट्स यांनी सांगितलेल्या जॉब्जविषयी. (Bill Gates On AI and Jobs)
गेट्स यांच्या मते, AI सिस्टम जे विकसित करतात आणि कोड लिहितात त्यांची नोकरी सुरक्षित आहे. कारण जरी AI कोड जनरेट करू शकत असला, तरी सॉफ्टवेअर विकासासाठी आवश्यक असलेले अष्टपैलुत्व, समस्या सोडवण्याची क्षमता आणि अचूकता AI कडे नाही. विशेषतः, डी-बगिंग, सुधारणा करणे आणि AI ला पुढे नेण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यकच राहील.
गेट्स म्हणाले की, जरी AI मोठ्या प्रमाणातील डेटाचा वेगाने अभ्यास करू शकतो आणि आजारांचे निदान करण्यात मदत करू शकतो, तरीही वैज्ञानिक संशोधन आणि चिकित्सक विचारसरणी त्याला आत्मसात करता आलेली नाही. AI ला स्वतंत्रपणे संकल्पना मांडता येत नाहीत, त्यामुळे भविष्यातही जीवशास्त्रज्ञ वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.
ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलताना गेट्स म्हणाले की, जरी AI मुळे कार्यक्षमता वाढू शकते, तरीही हे एक गुंतागुंतीचे क्षेत्र आहे, त्यामळे यात मानवी तज्ज्ञांची भूमिका अनिवार्य आहे. विशेषतः संकट व्यवस्थापन आणि दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन यामध्ये मानवी निर्णय अत्यंत महत्त्वाचे राहतील.
'द टुनाईट शो स्टॅरिंग जिमी फॅलन' या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स म्हणाले की, AI मुळे नोकऱ्यांना खरोखरच धोका निर्माण झाला आहे. पुढील दशकभरात बहुतेक गोष्टींसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज राहणार नाही. सध्या काही तज्ज्ञ "दुर्मिळ" आहेत, म्हणूनच आपण अजूनही "उत्कृष्ट डॉक्टर" किंवा "उत्कृष्ट शिक्षकांवर" अवलंबून आहोत.
पण पुढील दशकात एआयमुळे ही सेवा मोफत आणि सहज उपलब्ध होईल. जसे की उत्तम वैद्यकीय सल्ला किंवा उत्कृष्ट शिकवणी AI मुळे मिळेल. तथापि, काही गोष्टी AI कधीच बदलू शकणार नाही. उदाहरणार्थ, लोक कदाचित मशिनद्वारे खेळलेला बेसबॉल पाहण्यात रस घेणार नाहीत.
काही गोष्टी आपण स्वतःसाठी राखून ठेवू. पण उत्पादन, वाहतूक आणि अन्ननिर्मिती यासारख्या क्षेत्रांत मानवी सहभाग हळूहळू कमी होत जाईल.
बिल गेट्स यांचे मत आहे की, जरी एआय अनेक व्यवसायांवर प्रभाव टाकत असला, तरी कोडर्स, जीवशास्त्रज्ञ आणि ऊर्जा तज्ज्ञ यांची नोकरी सध्या तरी सुरक्षित आहे. भविष्यात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी काही विशिष्ट कौशल्ये आणि मानवी हस्तक्षेप अपरिहार्य राहतील.