

मयमनसिंग जिल्ह्यात एका गारमेंट फॅक्टरीत सुरक्षा रक्षकाच्या हत्यांनंतर बांगलादेशातील ढाका, चितगावसह अनेक शहरांमध्ये अल्पसंख्याक आणि नागरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत.
Bangladesh violence
ढाका : बांगलादेशातील मयमनसिंग जिल्ह्यात एका गारमेंट फॅक्टरीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हिंदू तरुणाची त्याच्याच सहकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली. ड्युटीवर असताना सहकाऱ्याने सरकारी बंदुकीतून गोळी झाडल्याने हा प्रकार घडला. गेल्या दोन आठवड्यांत बांगलादेशात हिंदू व्यक्तीच्या हत्येची ही तिसरी घटना आहे.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, बजेंद्र बिस्वास (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते 'अनसार' दलाचे सदस्य होते. बांगलादेशात 'अनसार' हे गृह मंत्रालयांतर्गत असलेले एक निमलष्करी दल आहे. स्थानिक पोलीस माहितीनुसार, आरोपी नोमान मिया (२९) हा देखील अनसार युनिटमध्ये तैनात होता. या दलावर सरकारी कार्यालये आणि कारखान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. बिस्वास आणि मिया हे दोघेही कारखान्यातील अनसार बॅरेकमध्ये थांबले होते. संवादादरम्यान आरोपी नोमान मियाने गमतीत आपली सरकारी बंदूक बिस्वास यांच्याकडे रोखली. मात्र, अचानक बंदुकीतून गोळी सुटली आणि ती बिस्वास यांना लागली. त्यांना तात्काळ भालुका उपजिल्हा आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी मोहम्मद जाहिदुल इस्लाम यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मयमनसिंग मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. वाढत्या हिंसाचारामुळे चिंता डिसेंबर महिन्यातील हिंदू व्यक्तीच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १८ डिसेंबर रोजी भालुका येथेच दिपू चंद्र दास यांची ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने ठेचून हत्या केली होती. त्यांना मारहाण करून विवस्त्र करण्यात आले आणि नंतर पेटवून देण्यात आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी मयमनसिंगबाहेर आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
मयमनसिंग जिल्ह्यात एका गारमेंट फॅक्टरीत सुरक्षा रक्षकाच्या हत्यांनंतर बांगलादेशातील ढाका, चितगावसह अनेक शहरांमध्ये अल्पसंख्याक आणि नागरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. अल्पसंख्याकांना संरक्षण मिळावे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.भारत सरकार आणि विविध मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.